लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) तिकिट मशीन (ईटीआय) अद्ययावत करण्यात येणार आहेत. एसटी बस नेमकी कोठे आहे, तसेच बसमध्ये तिकिटानुसार किती प्रवासी आहेत, हे माहित करण्यासाठी या मशीनला ‘जीपीआरएस’ जोडण्यात येणार आहे.एसटी महामंडळाने ईटीआय मशीनमध्ये बदल करण्याचे ठरविले आहे. त्यात या मशीनला आता ‘जीपीआरएस कनेक्टीव्हीटी’चा अंतर्भाव होणार असून, हा बदल करण्यासाठी मशीनला नेट कनेक्टीव्हीटी असणे आवश्यक आहे. त्यासाठी ईटीआय मशीन नेटवर्कच्या क्षेत्रात न्याव्या लागणार आहेत. ही प्रक्रिया पार पाडताना एसटी कर्मचाऱ्याच्या उपस्थितीत ट्रायमॅक्स कंपनीचे प्रतिनिधी सहकार्य करणार असून, ही कार्यवाही सर्वच विभागात पार पाडण्याची जबाबदारी एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयांकडे सोपविण्यात आली आहे. ही प्रक्रिया पार पाडताना ईटीआय मशीन गहाळ होणार नाही किंवा त्याला बाधा पोहोचणार नाही, ही काळजी घेण्याच्या सुचनाही विभागीयस्तरावर देण्यात आल्या आहेत. ईटीआयमधील या बदलामुळे एसटी बस नेमकी कोठे आहे. त्याची अचूक माहिती कळू शकणार आहे.
एसटीची तिकिट मशीन होणार अद्ययावत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 3:53 PM