मंगरूळपीर - मंगरूळपीर बस स्थानकामधून एमएच ३०, ६९४६ क्रमांकाच्या बसने मंगरुळपीर ते शेलूबाजार प्रवास करीत असलेल्या एका महिलेची विसरलेली पर्स एस.टी. कर्मचाºयाने परत करून प्रामाणिकपणाचा परिचय दिला.
मंगरूळपीर बस स्थानकामधून एमएच ३०, ६९४६ क्रमांकाच्या बसने जया खरे ही महिला ३ जून रोजी अकोला ते शेलूबाजार प्रवास करीत होती. प्रवास संपल्यानंतर या बसमध्येच पर्स विसरली. पर्समध्ये साडेसात हजार रुपये तसेच काही महत्त्वाची कागदपत्रेही होती. बस परत आल्यानंतर काही वेळाने ही बाब कर्तव्यावर असणारे रोखपाल अ. लतीफ अ. हमीद यांच्या निदर्शनास आल्यानंतर वाहक एल. एन. शेळके यांनी सदर पर्स ही आगारप्रमुख एस. पी. खंडेतोड यांच्याकडे सपुर्दू केली. खंडेतोड यांनी या पर्समधील आधारकार्ड व व्हीजिटींग कार्डवरील भ्रमनध्वनीवर संपर्क करुन संबंधित महिला प्रवाशाला बोलावून घेतले आणि या पर्समधील सात हजार ५१० रुपये रोख व महत्वाचे कागदपत्रे परत केले. यावेळी आगार व्यवस्थापक ए.के.मिर्झा व इतर कर्मचारी उपस्थित होते.