गेल्या वर्षीदेखील पावसात सातत्य नसल्याने शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागले. गतवर्षातील पीक नुकसानाच्या धक्क्यातून सावरत यंदा शेतकऱ्यांनी खरीप हंगामात जवळपास ९८ टक्के पेरणी आटोपली आहे. पेरणी आटोपल्यानंतर अधूनमधून पाऊस झाला. मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. ७ जुलैच्या रात्रीदरम्यान थोडाफार पाऊस झाल्याने पिकांना जीवदान मिळाले. १० जुलैपासून जिल्ह्यात कमी- अधिक प्रमाणात पाऊस होत असल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. दरम्यान, काही ठिकाणी शेतात पाणी साचल्याने पिकांचे नुकसानदेखील होत आहे. महसूल विभागासह कृषी विभागाने नुकसानाचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
०००००००
दापुरी खुर्द येथे पिकांचे नुकसान
दापुरी खु. परिसरात ११ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह संततधार पाऊस झाला. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्यामुळे पिकांचे नुकसान झाले तसेच काही शेतकऱ्यांचे शेत खरडून गेले. प्रशासनाने खरडून गेलेल्या शेताचा तत्काळ सर्व्हे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांनी केली.