लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर (वाशिम) : येथील संत बिरबलनाथ महाराजांच्या यात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला आहे. यानिमित्त शनिवारी २४ फेब्रुवारी रोजी भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. मंगरुळपीर येथे दरवर्षी संत बिरबलनाथ महाराज यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येते. बिरबलनाथ महाराजांचे समाधीस्थळ असलेल्या संत बिरबलनाथ महाराजांच्या मंदिरावर यात्रोत्सवानिमित्त आठवडाभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदाही येथे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत. त्यात भजनी मंडळाच्या कार्यक्रमासह भागवत कथा वाचन, हरीकिर्तनाचा समावेश आहे. जिल्हाभरात प्रसिद्ध असलेल्या या यात्रोत्सवात विविध ठिकाणचे हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. यंदाही यात्रोत्सवात भाविकांची मांदियाळी आहे. या यात्रोत्सवानिमित्त शनिवारी भाविकांना बिरबलनाथ महाराज मंदिरात महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत उभे राहून भाविकांनी महाप्रसाद घेतला. अभेदनाथ महाराजांच्या हस्ते भाविकांना दुपारी १ वाजतापासून महाप्रसाद वितरण करण्यात आले. निमंत्रित मान्यवरांच्या हस्ते महाप्रसादाचे पूजन करून भक्त पुरूष व महिलांना रांगेत महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी संस्थानच्या अध्यक्ष पुष्पादेवी रघुवंशी, रामकुवर रघुवंशी, कृष्णा रघुवंशी, अविस रघुवंशी, राम ठाकरे, ठाणेदार रमेश जायभाये आदि मान्यवर उपस्थित होते. यादरम्यान, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये पोलिसांनी चोख ठेवला होता.
मंगरुळपीर येथे बिरबलनाथ महाराज यात्रोत्सवाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 6:04 PM