वाशिम : जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समितीच्या २७ गणांसाठी १९ जुलै रोजी मतदान होणार असून, २९ जूनपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला प्रारंभ होणार आहे. कोरोनाकाळात राजकीय फड रंगणार असून, घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.
७ जानेवारी २०२० रोजी जिल्हा परिषदेचे ५२ गट आणि पंचायत समित्यांच्या १०४ गणांसाठी निवडणूक झाली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण होत असल्याने, यासंदर्भात दाखल याचिका निकाली काढताना सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गातील आरक्षण क्षमतेपेक्षा अधिक झाल्याचा मुद्दा समोर करून संबंधित सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समित्यांच्या २७ गणांसाठी पोटनिवडणूक होत आहे. २९ जून ते ५ जुलै यादरम्यान उमेदवारी अर्ज सादर करता येणार आहेत. या पोटनिवडणुकीला सामोरे जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, भाजपा, वंचित बहुजन आघाडी, जिल्हा विकास आघाडीने उमेदवारांची चाचपणीही केली. उमेदवारी आपल्यालाच मिळावी याकरिता इच्छुकांनी समर्थकांसह गॉडफादरकडे फिल्डिंग लावल्याने चुरस निर्माण झाल्याचे दिसून येते. उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, याकडे इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागून आहे.
०००००००००००००००००००
युती, आघाडीचे ठरेना !
जिल्हा परिषदेत राकाँ, काँग्रेस, शिवसेना व वंचित बहुजन आघाडीची सत्ता आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याला २९ जूनपासून प्रारंभ आहे. ५ जुलैपर्यंत ही प्रक्रिया चालणार असून, जिल्ह्यात अद्याप कोणत्याही पक्षाची युती किंवा आघाडी झाली नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवारही संभ्रमात असल्याचे दिसून येते.