कारंजा- शहरातील गौतम नगर, शांती नगर, वाल्मीक नगर या दलितवस्तीला पाणी पुरवठा करावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीने गुरुवारी दिला.
शहरातील गौतम नगर, शांती नगर, वाल्मीक नगर या दलितवस्तीला सुरळीत पाणी पुरवठा व्हावा म्हणून गवळीपुरा परिसरात पाण्याची टाकी उभारल्या गेली व शासनाच्या निधीतून पाइपलाइन व इतर असा करोडो रुपयांचा खर्च यावर करण्यात आला. सुमारे चार वर्षांअगोदर करोडो रुपये खर्च करून अजूनही या टाकीचे टेस्टिंग करणे तसेच पाइपलाइन व व्हॉल्व्ह बसविणे ही कामे झाली नाहीत. परिणामी, या परिसराला पाणी पुरवठा होत नाही, याबाबत अनेक निवेदने दिल्या गेलीत; मात्र कारंजा न.प. व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या कलगीतुऱ्यात व जबाबदारी एकमेकांवर ढकलल्यामुळे परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी टाहो फोडावा लागत आहे. रात्र-रात्र जागूनही पाणी मिळत नाही. तेव्हा हा दलितवस्तीला सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठी पाण्याच्या टाकीचे काम व इतर कामे पूर्ण करा, अन्यथा सात दिवसांत परिसरातील नागरिक, महिला तसेच आबाल-वृद्धांसह कोरोना नियम पाळून आंदोलन उभारले जाईल, असा इशारा कारंजा शहर वंचित-बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष सचिन खांडेकर यांच्यासह शेकडो नागरिकांनी एका निवेदनातून दिला आहे. तहसीलदारांनी निवेदनाची तत्काळ दखल घेत मुख्याधिकारी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना निवेदन अग्रेषित केले आहे.
या निवेदनानुसार कारंजा शहरात गौतम नगर व शांती नगर हा प्रामुख्याने दलित वस्ती असलेला परिसर आहे. या परिसरात मागील काही वर्षांपासून सातत्याने पाण्याची टंचाई राहते आणि मार्च ते जूनपर्यंत याची अधिक झळ या परिसरातील महिला व नागरिकांना व विद्यार्थी-विद्यार्थिनींनाही बसते. के.एन.कॉलेज ते गौतम नगर या पाइपलाइनवर व्हॉल्व्ह बसवून देण्यात यावा व त्याची टेस्टिंग करून देण्यात यावी व पूर्ण दाबाने या परिसरात पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा, असे निवेदनात नमूद आहे. न.प.ने दोन वर्षांअगोदर के.एन.कॉलेज परिसरात पाण्याची टाकी उभारली; मात्र गौतम नगर व शांती नगरला पाणी पुरवठा करणाऱ्या या विभागातील पाइपलाइनवर टाकीपासून एअर व्हॉल्व्ह बसविले नाही. शासनाने या योजनेसाठी लाखो रुपये खर्च करूनही हा परिसर सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी अजूनही वंचित आहे. गौतम नगर, शांती नगर, वाल्मीक नगर या परिसरात पाणीटंचाई उद्भवल्यामुळे तत्काळ सुरळीत पाणी पुरवठा करण्यात यावा, अन्यथा वंचित बहुजन आघाडीतर्फे कोरोना नियम पाळून आंदोलन उभारेल, असा इशारा देण्यात आला. या योजनेंतर्गतच्या कामाची चौकशी करून कारवाई करावी व सात दिवसांच्या आत येथे सुरळीत पाणी पुरवठा द्यावा, अशी मागणी केली. निवेदनावर वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष सचिन खांडेकर, कार्यकर्ते अतुल धनद्रव्ये, शुभम शिरसाट, अभिजित वानखडे, मिथुन गोटे, रितेश खंडारे यांच्यासह अनेक नागरिकांच्या व महिलांच्या स्वाक्षरी आहेत.