वाशिम : कारंजा वनपरिक्षेत्रात झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी लोकमतने सलग केलेल्या वार्ताकनाची दखल घेत वनविभागाने शनिवार, १ ऑगस्टपासून प्रत्यक्ष चौकशीला प्रारंभ केला आहे. यासाठी वनविभागाचे तीन पथक कार्यान्वित करण्यात आले असून सर्वप्रथम वनपरिक्षेत्रातील अनघड दगडी बांधाचे मोजमाप केले जात असल्याची माहिती सहायक वनसंरक्षक कैलास राठोड यांनी दिली. कारंजा वनपरिक्षेत्राला सन २0१२-१३ व २0१४-१५ या आर्थिक वर्षाच्या काळात जवळपास १0 कोटी रुपये मिळाले होते. मात्र, आरएफओ यु.ए.पठाण व त्यांच्या सहकार्यांनी कामे वाटपात तसेच प्रत्यक्ष कामात अनियमितता करुन भ्रष्टाचार केल्याची तक्रार धानोरा (ता. मंगरुळपीर) येथील राजेश वासुदेव चारखोड यांनी २१ एप्रिल २0१४ रोजी उपवनसंरक्षक, अकोला यांच्याकडे सबळ पुराव्यासह केली होती. दरम्यान, याप्रकरणी लोकमतने वस्तूस्थिती जाणून घेत सलग वार्तांंंकन केले. विधीमंडळ अधिवेशनातही हा प्रश्न उपस्थित झाल्याने गैरव्यवहाराची सखोल चौकशी व्हावी, असे निर्देश शासनाने दिले. त्यानुसार, यवतमाळ वनविभागाने तीन पथक कार्यान्वित करुन १ ऑगस्ट पासून चौकशीला प्रारंभ केला आहे. या पथकांमध्ये पुसद, यवतमाळ, मंगरुळपीरच्या सहायक वनसंरक्षकांचा समावेश आहे.
वनक्षेत्रातील कामांच्या चौकशीला प्रारंभ
By admin | Published: August 03, 2015 12:43 AM