दापुरा : विमुक्त भटक्या जातीच्या आरक्षणासंदर्भात रेणके आयोगाने शिफारसीत केलेली चूक समाजाला भोवली.त्यामुळे समाज आरक्षणापासून वंचित राहिला. मात्र ,आगामी काळात विमुक्त भटक्या जातीच्या आरक्षणाचा लढा तीव्र करू व समाजाला न्याय मिळवून देऊ असे मत आ.हरिभाऊ राठोड यांनी १६ जून रोजी येथे आयोजित बंजारा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले. वसंतराव नाईक युवा संघटना व दापुरा बंजारा समाजाच्यावतीने दहाव्या बंजारा महोत्सवाच्या अध्यक्षस्थानावरून आ.राठोड बोलत होते. या महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योगपती किसन राठोड (पुणे) यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून आ.संजय राठोड, गोर बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष हिरासिंग राठोड, माजी जि.प.अध्यक्ष दिलीप जाधव, माजी सभापती जयकिसन राठोड, माजी जि.प.उपाध्यक्ष बाबूसिंग नाईक, जि.प.सदस्य मोहन महाराज, अकोला जि.प.सदस्य शिवसेना नेते डॉ.सुभाष राठोड, दिनेश राठोड, जि.प.सदस्य राजेश जाधव, माजी सदस्य रामकिसन चव्हाण, प्रकाश राठोड, पं.स.सदस्य अशोक चव्हाण, शालीकराम राठोड, संयोज कडा, गणपत राठोड, प्रा.विपीन राठोड यांच्यासह सत्कारमूर्ती व मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी राठोड म्हणाले की, संपूर्ण भारतात बंजारा समाज ९ कोटीपेक्षा जास्त आहे. तेव्हा आपल्या समाजाला स्वतंत्र जातीत समाविष्ट करून घेण्यासाठी लढा उभारणे गरजेचे असून या आरक्षणाच्या लढय़ात पक्षभेद विसरून पुन्हा सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे सांगीतले. उद्घाटकीय भाषणात पुणे येथील उद्योगपती किसन राठोड यांनी समाजातील सर्वांनी एकीरिता सामाजिक, सांस्कृतिक परंपरेचे जतन करणे आवश्यक असल्याचे सांगत बंजारा समाजाने संत सेवालाल महाराज यांच्या आदर्शाप्रमाणे वाटचाल करावी असे आवाहन केले. प्रमुख पाहुणे आ.संजय राठोड यांनी यावेळी मार्गदर्शन करताना समाजाचे नेते स्व.वसंतराव नाईक यांच्यापासून सुरू असलेल्या आरक्षणाच्या लढय़ाला यश आले नाही.परंतु ,समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी पक्षभेद विसरून समाजाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर आपण रस्त्यावर उतरू असे म्हटले. यावेळी या महोत्सवात इतर मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या पुणे येथील डॉ.संयोगिता नाईक, हैद्राबाद येथील डॉ.सूर्या धनंजय, डॉ.निशा घुडे कोल्हापूर, डॉ.सुनिता राठोड औरंगाबाद, जिजाबाई राठोड चाळीसगाव, डॉ.ललीता राठोड बीड आदी महिलांना बंजारा महिला पुरस्कार हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात आलेल्या मान्यवरांचे स्वागत डफडे वाजवून व पारंपरिक वेशभूषेत मुलींनी तिलक करून केले तर पुसदचे गायक दत्तराम आडे व संच व दापुरा येथील गायक संजय राठोड यांनी संत सेवालाल वसंतराव नाईक यांच्या जीवनावरील गीते गायिले. दापुराचे माजी सरपंच दूधराम पवार यांच्या मार्गदर्शनात महोत्सवाचे कार्याध्यक्ष तथा पं.स.सदस्य मधुसुदन राठोड, व्यवस्थापक तथा सरपंच सुनील राठोड यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केले. राज्यस्तरीय बंजारा महोत्सवाला दुर्गामाता क्रीडा मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.या महोत्सवाला भारतातील विविध राज्यात राहणारे बंजारा बांधव तथा जिल्ह्यातील बहुसंख्य बंजारा समाज बांधवाची उपस्थिती होती.
राज्यस्तरीय बंजारा महोत्सव सुरु
By admin | Published: June 17, 2014 7:58 PM