जिल्ह्यातील कारंजा उपजिल्हा रुग्णालयांतर्गत गतवर्षी डायग्नोस्टिक मटेरियल, सीसीटीव्ही कॅमेरे, फर्निचर खरेदी, रेफ्रिजरेटर, इन्व्हर्टर, बॅटरी, डेझर्ट कूलर, बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट साहित्य, फ्लेक्स, औषधी, स्टेशनरी, रिफ्रेशमेंट, कापड खरेदीसह जनरेटर दुरुस्ती, वीज दुरुस्ती, सोनोग्राफी देयक, आहार सेवा, कंत्राटी कर्मचारी नियुक्ती असे विविध आर्थिक व्यवहार पार पडले आहेत. हे सर्व साहित्य खरेदी करताना नियमांचे उल्लंघन झाल्याचे आणि त्यापैकी काही साहित्याचा आदेशापूर्वीच पुरवठा होऊन याची देयकेही अदा करण्यात आल्याचे माहिती अधिकारातून उघडकीस आले होते. ‘लोकमत’ने १८ नोव्हेंबर रोजी ‘उपजिल्हा रुग्णालयात साहित्य खरेदीत अनियमितता’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समितीची नियुक्ती केली. तथापि, समितीने चौकशीचा अहवाल सादर करण्यास विलंब केला. त्यामुळे ‘लोकमत’ने पुन्हा वृत्त प्रकाशित करून याकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यावर तीन आमदारांनी या प्रकरणी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केल्यानंतर आरोग्य विभागाकडून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी द्विसदस्यीय राज्यस्तरीय समितीची नियुक्ती करण्यात आली. या समितीने पाच दिवस उपजिल्हा रुग्णालयात चौकशी करून नोंदी घेतल्या आहेत. आता या समितीच्या अहवालाकडे लक्ष लागले आहे.
-------
सहा महिन्यांपूर्वी झाली जिल्हास्तरावर चौकशी
कारंजा उपजिल्हा रुग्णालयातील साहित्य खरेदीच्या कथित अनियमिततेप्रकरणी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून आरोग्य विभागाचे लक्ष वेधल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समिती नियुक्त केली. या समितीने २७ नोव्हेंबर रोजी उपजिल्हा रुग्णालयास भेट देऊन कागदपत्रांची तपासणी करीत चौकशी पूर्ण केली होती.
--------
कोट : कारंजा उपजिल्हा रुग्णालयातील साहित्य खरेदी प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्यस्तरावरूनच आरोग्य विभागामार्फत द्विसदस्यीय समितीची नियुक्ती केली होती. या समितीने पाच दिवस उपजिल्हा रुग्णालयात कागदपत्रांची तपासणी करून चौकशी पूर्ण केली आहे.
- डॉ. मधुकर राठोड,
जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम