वाशिम: स्थानिक स्वागत लाॅन येथे दोन दिवस सुरू असलेल्या चौथ्या राज्यस्तरीय मराठी बसव साहित्य संमेलनाचे रविवारी (दि.११) सुप वाजले. मध्ययुगीन भक्ती चळवळींचे सामाजिक उत्थानातील योगदान, पर्यावरण संरक्षणासाठी संतांची हाक यांसह अन्य विषयांना साहित्यिक, लेखकांनी हात घालत या संमेलनाची सांगता झाली.
महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, वचन अकादमी, महाराष्ट्र बसव परिषद आणि बसव विचार केंद्र वाशिम यांच्यासंयुक्त विद्यमाने वाशिम येथील स्वागत लाॅन येथे १० फेब्रुवारीला चौथे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाला सुरूवात झाली होती. रविवारी (दि.११) दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाला महात्मा बसेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून सुरूवात करण्यात आली. दुपारी १२ वाजताच्या परिसंवाद कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे येथील प्रसिद्ध लेखिका डाॅ. नलिनीताई वाघमारे होत्या. डॉ. वाघमारे यांनी समाज माध्यमाच्या जास्त आहारी जाऊन नये तसेच प्रत्येक गोष्टीबाबत तार्किक पडताळणी करावी, असे विचार व्यक्त केले.
इचलकरंजी येथील प्रसिद्ध लेखक डाॅ. विनायक होगाडे यांनी मध्ययुगीन भक्ती चळवळीचे सामाजिक उत्थानातील योगदान या विषयावर विचार व्यक्त केले. मध्ययुगीन भक्ती चळवळीला त्यांनी उजाळा दिला. उदगिर येथील प्रसिद्ध लेखक डॉ. मल्लिकार्जुन तंगावार यांनी ‘पर्यावरण संरक्षणासाठी संतांची हाक’ या विषयावर प्रकाश टाकला. आजरोजी पर्यावरणीय संतुलन बिघडविण्यास अनेक घटक कारणीभूत असल्याचे नमूद करीत पर्यावरण संरक्षणासाठी संत-महतांनी मोठे योगदान दिलेले आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या काळात पर्यावरण संरक्षणासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यवतमाळ येथील प्रसिद्ध लेखिका प्रा. सीमा शेटे-नवलाखे यांनी ‘अक्कमहादेवी- जिजाऊ -सावित्री यांचा वारसा आणि आजची स्त्री’ या विषयावर विचार व्यक्त करताना स्त्रियांच्या उज्वल इतिहासाला उजाळा दिला. समारोपिय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वाशिमचे प्रसिद्ध साहित्यिक बाबाराव मुसळे तर प्रमुख अतिथी म्हणून सुरेश लोध, संमेलनाचे स्वागताध्यक्ष काशिनाथआप्पा लाहोरे, दीपकआप्पा गाडे, किशोरआप्पा पेंढारकर, विश्वंबरआप्पा महाजन, अध्यक्ष बसव विचार केंद्र वाशिम, संजय आप्पा खेलुरकर यांची उपस्थिती होती. समारोपिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजु जुबरे तर आभार वचन अकादमीचे अध्यक्ष प्रा. डॉ. सचितानंद बिचेवार यांनी मानले. बसव साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेकरिता सर्व आयोजन समिती सदस्यांनी परिश्रम घेतले.