वाशिम : राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे आयोजन १२ व १३ डिसेंबर २०२० रोजीकरण्यात आले आहे. या मेळाव्यात वाशिम जिल्ह्यासह राज्यातील विविध कंपन्यांमधील सुमारे ६५ ते ७० हजार रिक्त जागा भरण्याचे नियोजित आहे. त्या अनुषंगाने रोजगार इच्छुक उमेदवारांना संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रतेनुसार सहभागी होता येणार असल्याचे वाशिम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी सांगितले.महारोजगार मेळाव्यात वाशिम जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यातील इयत्ता चौथी उत्तीर्ण ते सर्वशाखीय डिप्लोमा, आय.टी.आय. तसेच पदवी आणि पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता असणाऱ्या रोजगार इच्छुक स्त्री, पुरुष उमेदवारांना त्यांच्याकडील एम्प्लॉयमेंट कार्डच्या युझरनेम व पासवर्डमधून मेळाव्यात सहभागी होता येईल. उमेदवारांना पसंतीक्रमानुसार व उद्योजकांच्या सोयीनुसार मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ उद्योजकांकडून एस.एम.एस., दूरध्वनी, ई-मेल किंवा सोयीच्या माध्यमाद्वारे कळविण्यात येईल. त्यानुसार ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलखाती घेण्यात येणार आहेत.वाशिम जिल्ह्यातील रोजगार इच्छुक उमेदवारांसह राज्यातील इतर जिल्ह्यातील उमेदवारांनी सुद्धा या महारोजगार मेळाव्यात ऑनलाईन पद्धतीने सहभाग नोंदवावा, अधिक माहितीकरिता वाशिम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन बजाज यांनी केले.
राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळावा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2020 5:05 PM