वाशिम : संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेच्या वतीने वाशिम येथे आयोजित राज्यस्तरीय वारकरी महाअधिवेशनास ६ जानेवारी रोजी स्थानिक वाटाणे मंगल कार्यालय येथे थाटात प्रारंभ झाला. या महाअधिवेशनाचे उद्घाटन अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे अध्यक्ष हभप प्रकाश महाराज बोधले (बीड) यांच्या हस्ते झाले असून अध्यक्षस्थानी कैकाडी महाराज मठ पंढरपूरचे प्रमुख तथा संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शिभप शिवराज महाराज जाधव आहेत. यावेळी राष्ट्रीय मार्गदर्शक हभप बद्रीनाथ महाराज तनपूरे, मृदंगाचार्य हभप उद्धवबापू महाराज, हभप बापूसाहेब महाराज देहूकर, हभप मधुकर महाराज खोडे, संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष हभप गंगाधर महाराज कुरुंदकर यांच्यासह राज्यभरातील वारक-यांची उपस्थिती आहे. रविवारी दिवसभर विविध विषयांवर मान्यवरांची व्याख्याने आहेत. शेतक-यांच्या विविध प्रश्नांवर मंथनया अधिवेशनाच्या प्रारंभीच शेतक-यांच्या विविध प्रश्नांवर मंथन झाले. संत तुकडोजी महाराज यांच्यासह महान वारक-यांनी शेतक-यांच्या बाजूने भूमिका मांडलेल्या आहेत. आज शेतक-यांची भयावह परिस्थिती असून, या परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी वारकरी, टाळकरी यांनी एकत्र आले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
वाशिम येथे राज्यस्तरीय वारकरी महाअधिवेशनास प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2019 3:09 PM