लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस-सिलिंडरची नियमबाह्य वाहतूक सर्रास सुरू असल्याच्या माहितीवरुन ‘लोकमत’ने शुक्रवारी केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’दरम्यान चक्क प्रवासी आॅटोंमधून गॅस-सिलिंडरची वाहतूक होत असल्याचा गंभीर प्रकार निदर्शनास आला.संबंधित त्या-त्या कंपन्यांकडे टोल फ्री क्रमांकाव्दारे अथवा प्रत्यक्ष एजन्सी असलेल्या ठिकाणी जावून घरगुती ‘गॅस-सिलींडर’चा रितसर नंबर लावल्यास घरपोच सिलींडर पोहचविण्याची जबाबदारी त्या-त्या एजन्सीकडे असते. यासाठी १२ किलोमिटरच्या अंतरापर्यंत कुठलेही शुल्क आकारू नये, असा शासनाचा नियम आहे; परंतु सर्व कायदे-नियमांची मोडतोड करून ठराविक काही लोकांना वाशिममधील गॅस एजन्सी मागेल तेवढे सिलींडर पुरवत असल्याचा गंभीर प्रकार घडत आहे. यासंदर्भात प्राप्त माहितीवरून ‘लोकमत’ने शुक्रवारी ‘स्टिंग आॅपरेशन’ केले असता एका निनावी क्रमांकाच्या आॅटोमध्ये घरगुती वापराच्या सिलींडरची वाहतूक सुरू असल्याचे दिसून आले. दुसऱ्या एका प्रवासी आॅटोमध्ये ७ ते ८ सिलींडर ठेवून ग्रामीण भागात नेले जात असल्याचा प्रकार निदर्शनास आला.तथापि, जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये घरगुती वापराच्या गॅस-सिलींडरची बेकायदेशीर वाहतूक करणे हा दखलपात्र गुन्हा असतानाही संबंधित यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने हा प्रकार वाशिमसह जिल्ह्यातील अन्य ठिकाणी सर्रास सुरू असल्याचे दिसून येत आहे. ‘गॅस-सिलींडर’ची प्रवासी वाहनांमधून (अॅपे) वाहतूक करणे पूर्णत: चुकीचे आहे. एवढेच नव्हे; तर दुचाकी वाहनावरूनही ‘सिलींडर’ची वाहतूक करता येत नाही. मात्र, याऊपरही नागरिक धोका पत्करतात. हा प्रकार बंद करण्यासाठी तहसीलच्या पुरवठा विभागाकडून निश्चितपणे पुढाकार घेतला जाईल. प्रवासी वाहनांमधून गॅस-सिलींडरची वाहतूक यापुढेही सुरूच राहिल्यास चोख तपासणी करून संबंधितांविरूद्ध धडक कारवाईची मोहिम हाती घेण्यात येईल.- विजय सावळे, तहसीलदार, वाशिम
Sting Operation : घरगुती गॅस-सिलिंडरची नियमबाह्य वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 3:17 PM