वाशिम: ११ व १२ ऑक्टोबरदरम्यान तीन चोरीच्या घटनेमधून सव्वा लाखाच्यावर ऐवज लंपास झाला. जिल्ह्यातील जांभरुण (जहागीर) येथे ५0 हजार, रिसोड येथे ७३ हजार, इरळा येथे १0 हजार आणि रिसोड येथील व्यापार्याचे ९0 हजार अशा एकूण दोन लाख २३ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. रिसोड: दुकानामधून घरी जात असताना व्यापार्याच्या मोटारसायकलवरून ९0 हजार रुपये दागिने असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केल्याची घटना १२ ऑक्टोबरच्या रात्री ९.४0 वाजता लोणी फाट्याजवळ घडली. व्यापारी बद्रीनारायण तोष्णीवाल हे नेहमीप्रमाणे दुकानामधील रोख ५0 हजार व दुरुस्तीसाठी आणलेल्या २ तोळे सोन्याच्या बांगड्या, चार ग्रॅम अंगठी असा एकूण ९0 हजाराचा माल घेऊन रात्री ९.१५ वाजतादरम्यान घरी जाण्यासाठी निघाले. काही मिनिटात ते घरी पोहोचून घराचे गेट एका हाताने उघडत असताना, समोरून मोटरसायकलवर आलेल्या दोघांनी तोष्णीवाल यांच्या मोटारसायकलवरील बॅग लंपास केली. याप्रकरणी रिसोड पोलिसांनी अमित कुशवाह व सुमित कुशवाह यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, अमित कुशवाह याला अटक केली. सुमित हा फरार आहे. दोघाविरुद्ध भादंवि कलम ३९२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर आरोपी हे गुपचूप विक्री करीत असल्याचे कळते. अनसिंग : घरामध्ये घुसून कपाटातील ४0 हजारांचे दागिने व १0 हजार रुपये रोख असा ५0 हजार रुपयाचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास झाल्याची घटना जांभरुण (जहागीर) येथे सोमवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी जांभरूण येथील दत्ता बाबाराव ठाकरे यांनी अनसिंग पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. बिट जमादार गजानन सरोदे यांनी पंचनामा करून अज्ञात चोरट्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. रिसोड: भरदिवसा घरामधून ७३ हजार रुपये सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना २८ सप्टेंबर रोजी मालेगाव नाक्यास्थित एका खासगी हॉस्पिटलच्या मागे घडली होती. १३ ऑक्टोबर रोजी तक्रार दिल्याने संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. रतन नरवाडे यांच्या फिर्यादीनुसार मालेगाव नाक्यास्थित फिर्यादीच्या आईचे वास्तव्य असून, घरामध्ये असलेल्या पिशवीतील ७३ हजाराचा माल लंपास केला आहे. याप्रकरणी संशयित आरोपी गणेश अंभोरे याच्याविरुद्ध भादंवि कलम ३६0 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
चोरीच्या घटनांनी जिल्हा हादरला!
By admin | Published: October 14, 2015 2:00 AM