लाेकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बनावट क्रमांकाद्वारे चोरीची वाहने जिल्ह्यात धावत असल्याचा गंभीर प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. वाहतूक नियम न पाळल्याप्रकरणी पोलीस प्रशासनाने दंड ठोठावल्यानंतर संबंधित वाहनाच्या मूळ मालकाला मोबाइलवर संदेश मिळतो. या संदेशातून एकाच क्रमांकाची दोन वाहने जिल्ह्यात धावत असल्याचे समोर आले आहे.वाहन खरेदीनंतर परिवहन विभागाकडून वाहनाला क्रमांक दिला जातो. यामुळे चोरीची वाहने रस्त्यावर धावणार नाही, अशी अपेक्षा असते. वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्यास यापूर्वी ऑफलाईन पद्धतीने दंड वसूल केला जात होता. गत पाच महिन्यांपासून दंड वसूली पद्धतीला ऑनलाईनची जोड देण्यात आली. वाहतूक नियम मोडणाऱ्या चालकावर कारवाई केल्यानंतर वाहन मालकाला ऑनलाईन पद्धतीने मोबाईल क्रमांकावर संदेश पाठविले जातात. या संदेशातून बनावट क्रमांकाची वाहने रस्त्यावर धावत असल्याचा गंभीर प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. यापूर्वीदेखील हा प्रकार समोर आला असता, उपप्रादेशिक परिवहन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. आता परत एकाच क्रमांकाची दोन वाहने रस्त्यावर धावत असल्याचे समोर आले. एमएच ३० ए,झेड ५८९८ क्रमांकाचे अकोला जिल्हातील वाहन हे गत एका महिन्यात वाशिम जिल्ह्यात आलेले नसतानाही, दंड आकारल्याचा संदेश मोबाइलवर प्राप्त झाला, असे वाहन मालक संजय तायडे यांनी सांगितले. यापूर्वीदेखील एकाच समान क्रमांकाचे दोन वाहने जिल्ह्यात धावत असल्याचे समोर आले होते. यामुळे जिल्ह्यात चोरीची वाहने धावत तर नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आतापर्यंत चार जणांच्या मोबाइलवर असे संदेश आले आहेत. त्यामुळे या प्रकाराची चाैकशी करणे गरजेचे ठरत आहे. एका वाहनाला एकच क्रमांक दिला जातो. त्यामुळे एकाच क्रमांकाची दोन वाहने असतील, तर या प्रकाराची चौकशी केली जाईल.
- ज्ञानेश्वर हिरडे,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशिम
एमएच ३० ए,झेड ५८९८ क्रमांकाचे वाहन वाशिम जिल्ह्यात नेण्यात आले नाही. तथापि, या वाहनाला दंड झाल्याबाबत मोबाइलवर संदेश आला आहे. त्यामुळे या क्रमांकाचा कुणी गैरवापर करून दुसरे वाहन रस्त्यावर आणले असण्याची शक्यता आहे. या प्रकाराची चौकशी व्हावी.- संजय तायडे, वाहनमालक