वाशिम: केंद्र पुरस्कृत विविध अर्थ सहाय्यित योजनांतील ५ हजारांहून अधिक लाभार्थींचे अनुदान थांबविण्यात आले आहे. आधार क्रमांक, वयाचा दाखल्यासह विविध आवश्यक कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना महसूल प्रशासनाकडून या लाभार्थींना देण्यात आल्या असून, ते प्राप्त न झाल्यास संबंधित लाभार्थींचे अनुदान बंदच करण्यात येणार असल्याचे संबंधित अधिकाºयांकडून सांगण्यात आले.
वाशिम जिल्ह्यात केंद्र सरकार पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग योजना, तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना आधार क्रमांक, वयाचा दाखला, अंपंगत्वाचे आॅनलाइन प्रमाणपत्र, तसेच तलाठ्याच्या दाखल्यासह इतर आवश्यक कागदपत्रे संजय गांधी निराधार योजनेच्या विभागाकडे सादर करण्याच्या सूचना मागील काही महिन्यांपूर्वी देण्यात आल्या आहेत. त्यामधील ५ हजारांहून अधिक लाभार्थींनी अद्यापही ही कागदपत्रे सादर केली नाहीत. यामध्ये एकट्या मंगरुळपीर तालुक्यातील तब्बल ३ हजार लाभार्थींचा समावेश आहे. वाशिम जिल्ह्यात इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेचे १९ हजार ४८० लाभार्थी आहेत. त्याशिवाय इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतने योजनेचे ४४०, तर इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग निवृत्ती वेतन योजनेचे ५३ लाभार्थी मिळून एकूण १९ हजार ९७३ लाभार्थी आहेत. त्यामधील पाच हजारांहून अधिक लाभार्थींना कागदपत्रे प्रशासनाकडे सादर करण्यात आली नाहीत. त्यामुळे या लाभार्थींचे अनुदान थांबविण्यात आले आहे.