रिसोड : आघाडी सरकारने अचानक ‘यू टर्न’ घेत शेतकऱ्यांच्या शेतातील कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष असून अनेक शेतकऱ्यांची उभी पिके वाळत आहेत. ‘महावितरण’च्या या तुघलकी कारभाराविरोधात संपूर्ण जिल्ह्यात भूमिपुत्र शेतकरी संघटना गुरुवारी (दि.१८) रस्ता रोको आंदोलन करणार आहे.
जिल्ह्यात नव्वद टक्के कृषीपंपांना मीटरच नाहीत मग महावितरण थकबाकीचे आकडे कसे काय सांगू शकते. अंदाजित अव्वाच्या सव्वा रक्कमा बिलावर टाकून शेतकऱ्याची लूट केली जात आहे. जिल्ह्यात सिंचनाची व्यवस्था असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी मूग, भुईमूग, भाजीपाला, ऊस, पपई अशी अनेक पिके पेरलेली आहेत. उन्हाळा तापत आहे. उन्हाळी पिकांना तीसऱ्या दिवशी पाणी द्यावे लागते. याची जाणीव ‘महावितरण’ने ठेवायला पाहिजे. शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत शासन पाहत आहे. कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित करणे थांबत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून करण्यात आल्याची माहिती भूमिपुत्र शेतकरी संघटनेच जिल्हाध्यक्ष रामेश्वर अवचार यांनी दिली आहे.