वाशिम : खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि मसालेदार, तिखट पदार्थांमुळे पोटात जास्त ॲसिड तयार होऊन वेळप्रसंगी ‘पोटाचा अल्सर’ या आजाराला सामोरे जाण्याची भीती वैद्यकीय क्षेत्रातून वर्तविली जात आहे. अल्परचा धोका ओळखून खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी वेळीच बदला आणि निरोगी राहा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला.
अलीकडच्या काळात खाण्यापिण्याच्या सवयी पार बदलून गेल्या आहेत. जेवणात तिखट व मसालेदार पदार्थांचा अधिक समावेश होत असल्याने पोटाच्या अल्सर आजाराला निमंत्रण देण्यासारखेच ठरत आहे. पोटात जास्त ॲसिड तयार होऊन आतड्यांना आतून व्रण पडतात. यास पोटाचा अल्सर म्हणतात. याकडे प्राथमिक टप्प्यात दुर्लक्ष केल्यास हे व्रण मोठे होऊन वेळप्रसंगी जखमाही होतात तसेच पोटातील बॅक्टेरिया इन्फेक्शनमुळे ही समस्या होऊ शकते. अल्सरचे अनेक प्रकार आहेत. पेप्टिक अल्सर झाल्यामुळे पोटात आतून व्रण पडतात तसेच गॅस्ट्रिक अल्सर झाल्यावर जेवणानंतर पोटात वेदना सुरू होतात. अशी लक्षणे दिसू लागताच तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
०००००००००००००००००
काय आहेत अल्सरची लक्षणे
जेवणानंतर लगेच पोट दुखणे.
पोटाच्या वरच्या बाजूला वारंवार दुखणे.
पोट फुगल्यासारखे वाटणे.
उलट्या होणे
भूक मंदावणे
वजनात अचानक घट होणे
काळी शौच होणे
छातीत व पोटात जळजळणे.
०००००००
काय काळजी घेणार
तिखट, मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.
धूम्रपान, तंबाखू व मद्यपान यासारखी व्यसने टाळावीत.
वेळी, अवेळी जेवणे, जास्त काळ उपाशी राहण्याची सवय टाळावी.
मानसिक ताणतणाव घेऊ नये.
आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे समाविष्ट करावी.
केळी, डाळिंब, सफरचंद, स्ट्रॉबेरी अशी फळे खावीत.
०००००००००००००००
पौष्टिक आहार हाच महत्त्वाचा
कोट
मसालेदार, तिखट पदार्थ खाणे टाळावे. हिरव्या पालेभाज्यांचा तसेच फळांचा समावेश करावा. अल्सरची लक्षणे जाणवू लागताच तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. नीलेश बढे
पोट विकार तज्ज्ञ, वाशिम.
००००
खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धती टाळाव्या. वेळीच उपचार मिळाल्यास या आजारातून रुग्ण पूर्णपणे बरा होतो.
- डॉ. अनिल कड
पोटविकार तज्ज्ञ, वाशिम