लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर: शहरी तथा ग्रामीण भागातील गरोदर महिलांच्या गर्भावस्थेची तपासणीसाठी शासनाने लाखो रुपये खर्च करून महागडे सोनोग्राफी यंत्र उपलब्ध केले; मात्र गेल्या दोन वर्षांपासून मंगरुळपीर येथील सोनोग्राफी यंत्रच बंद असल्याने गरोदर महिलांची मोठी ससेहोलपट होत असल्याचे दिसत आहे.तालुक्यातील गरोदर महिलांना आपल्या गर्भवस्थेची तपासणी करून गर्भाच्या आरोग्याविषयी औषधोपचार करता यावा, हा सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवून शासनाने गेल्या सहा वर्षापूर्वी या ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी यंत्र उपलब्ध करून दिले सुरुवातीच्या काळात गर्भावस्थेच्या तपासणीकरिता तालुक्यातील गरोदर महिला हजेरी लावत असत. दर गुरुवारी किमान १०० महिलांची तपासणी केली जात असे. ही तपासणी मोफत असल्यामुळे गरोदर महिलांना दिलासा मिळत होता.शहरी तथा ग्रामीण भागातील गोरगरीब महिलांना खासगी दवाखान्यातील महागडी तपासणी परवडत नसल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात तपासणी करणे सोयीचे होते; परंतु आता सोनोग्राफी यंत्रच बंद असल्याने गोरगरीब गरोदर महिलांना आपल्या गर्भवस्थेची तपासणी करण्याकरिता खासगी दवाखान्याकडे धाव घ्यावी लागत आहे. एवढेच नव्हे तर बाहेरगावी जावे लागते, यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून आणि वेळेचा अपव्यय होऊन त्रास सहन करावा लागत आहे. या महिलांच्या समस्येची जाण ठेवून जिल्हा आरोग्य प्रशासनाने दखल घेणे अपेक्षित आहे. याकडे लक्ष दिल्या जात नसल्याने जनसामान्यात आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. एवढेच नव्हे तर बालकाच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने बेबी केअर युनिट आहे; मात्र यंत्रसुद्धा बंद अवस्थेत आहे. ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी कक्ष आणि एक्सरे कक्ष बंद असल्याची माहिती वरिष्ठांना देऊन ते कक्ष सुरू करण्याबाबत वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे. एक्सरे कक्षातील तांत्रिक२ कर्मचाऱ्याचे रिक्त पद भरून तो येत्या काही दिवसांत सुरू करण्यात येणार आहे.- डॉ. श्रीकांत जाधववैद्यकीय अधिक्षक मंगरुळपीर
ग्रामीण रुग्णालयातील सोनोग्राफी यंत्र बंद!
By admin | Published: June 17, 2017 12:39 AM