वाशिम, दि. १0- मोदी सरकारच्या नोटाबंदी व अन्य जनविरोधी धोरणाच्या विरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी जिल्हाभरात रास्ता रोको, धरणे, डफडे बजाव व थाळीनाद आंदोलन केले. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील नोटाबंदीनंतरची परिस्थिती सुधारण्यासाठी व शेतकर्यांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको व धरणे आंदोलन केले. मोदी सरकारने जनविरोधी धोरण राबवून सर्वसामान्यांना वेठीस धरले आहे, असा आरोप करून नोटाबंदीच्या एक तर्फी निर्णयाचा निषेध म्हणून काँग्रेसतर्फे वाशिम, रिसोड, मालेगाव, कारंजा, मानोरा व मंगरूळपीर येथे रास्ता रोको आंदोलन केले. नोटाबंदीनंतर निर्माण झालेली अस्थिरता ५0 दिवसानंतरही स्थिर झाली नाही. सर्वसामान्य जनतेला प्रचंड त्रास झाला व आताही होत आहे. या निर्णयाचा निषेध व धिक्कार करण्यासाठी ९ जानेवारीला काँग्रेसच्या व तीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या रास्ता रोको आंदोलनामुळे काही वेळेपुरती वाहतूक ठप्प झाली होती. वाशिम येथे जिल्हाध्यक्ष अँड. दिलीप सरनाईक यांच्या नेतृत्वात पदाधिकार्यांनी रास्ता रोको, डफडे बजाव व थाळीनाद आंदोलन केले. मालेगाव येथे शेलू फाट्यावर आमदार अमित झनक यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मानोरा येथे माजी आमदार विजयराव खडसे यांच्या नेतृत्वात दिग्रस चौकात धरणे आंदोलन केले. मंगरुळपीर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. कारंजा येथे जयस्तंभ चौक येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी दिलीप भोजराज, राज चौधरी, फारुक अली, अमित लाहोटी, उमेश शितोले यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नोटाबंदीच्या विरोधात रास्ता रोको!
By admin | Published: January 10, 2017 2:40 AM