लाेकमत न्यूज नेटवर्कमंगरूळपीर (जि. वाशिम) : विड्याच्या पानात खाण्यासाठी साखरेचे बत्ताशे औषध म्हणून दिले आणि या औषधामुळे तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल, असे महिलेला सांगणाऱ्या येडशी येथील भाेंदूबाबावर पाेलिसांनी साेमवारी गुन्हा दाखल केला. ग्रामीण रुग्णालय मंगरूळपीरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीकांत जाधव यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार पोलीस आणि आरोग्य विभागाने एकत्रित स्टिंग ऑपरेशन करीत भोंदूबाबाचा पर्दाफाश केला.
आराेग्य विभागातील एका कर्मचारी महिला व पाेलिसांनी भाेंदूबाबाच्या खाेलीत प्रवेश केला. तेथे भोंदूबाबाने संबंधित महिलेकडे आवश्यक विचारणा करून त्यांना विड्याच्या पानात खाण्यासाठी साखरेचे बत्ताशे औषध म्हणून दिले आणि ‘या औषधामुळे पुत्रप्राप्ती होईल,’ असे सांगितले. त्यानंतर फिर्यादी व पोलिस कर्मचाऱ्यांनीही बनावट मंडळी बनून खात्रीसाठी भोंदूबाबाकडे महिलेस दिलेल्या औषधाची चौकशी केली. त्यावर बाबाने ठासून हे औषध प्रभावी असल्याचे सांगितले.
भाेंदूबाबाच्या खोलीची झडती फिर्यादी डॉ. श्रीकांत जाधव आणि पोलिस कर्मचाऱ्याने बाबाच्या खोलीची झडती घेतली. त्यात पांढऱ्या रंगाच्या पोत्यामध्ये साखरेचे बताशे, विड्याची पाने, रद्दीचे पेपर व एका डब्यामध्ये चार छोट्या प्लास्टिकच्या बॉटलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे औषध मिळाले, हे सर्व साहित्य पंचासमक्ष जप्त केले.