विविध स्वरूपातील उपाययोजना करूनही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने ९ ते १५ मे या काळात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनामार्फत स्थानिक स्वराज्य संस्था, तहसीलदार, पोलीस प्रशासनावर सोपविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शिरपूर ग्रामपंचायतच्या सभागृहात सरपंच राजकन्या अढागळे यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच पोलीस निरीक्षक सुनील वानखेडे, ग्रामविकास अधिकारी भागवत भुरकाडे, तंटामुक्ती अध्यक्ष विश्वनाथ भालेराव, अशोकराव देशमुख, उपसरपंच असलम परसूवाले यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना दक्षता समितीची बैठक घेण्यात आली.
या बैठकीमध्ये शासनाने घोषित केलेल्या निर्बंधांचे पालन कटाक्षाने करण्यात येईल. विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. परवानगी नसणाऱ्या आस्थापना उघडल्यास संबंधित दुकानदारांवर कारवाई करण्यात येईल. पोलीस व महसूल विभागाचे याकामी सहकार्य घेण्यात येईल, असे ठरविण्यात आले. शासनाने घालून दिलेले निर्बंध ग्रामविकास अधिकारी भुरकाडे यांनी यावेळी सर्वांना वाचून दाखविले. याविषयी गावात दवंडी देण्यात येणार आहे. बैठकीला एन. व्ही. आंबुलकर, पी. एस. अंभोरे, ग्रामपंचायत सदस्य पप्पू देशमुख, आरोग्य कर्मचारी क्षितीज लांडगे, संतोष अढागळे, शशिकांत देशमुख यांच्यासह आशा व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.