^^^^^^^^
आधार प्रमाणिकरण कार्यक्रम थांबला
वाशिम : पीककर्जासह विविध योजनांसाठी शेतकऱ्यांना आधार प्रमाणिकरण आवश्यक आहे; परंतु जिल्ह्यात आधार प्रमाणिकरणाचे काम थांबले असून संबंधित शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार आहेत.
---------------
ग्रामस्थांची कोरोना चाचणी
वाशिम : रोजगारासाठी परजिल्ह्यांत गेलेले परिसरातील कामगार गावी परत आले आहेत. त्यांची चाचणी आवश्यक असून, आरोग्य विभागाने कोरोना चाचणीवर अधिक भर दिला असल्याने आता गावागावांत ग्रामस्थांची कोरोना चाचणी केली जात आहे.
------------------
अवैध दारूविक्रीवर पोलिसांची कारवाई
वाशिम: धनज बु. परिसरातील गावांत अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर धनज पोलिसांनी २७ आणि २८ जूनला कारवाई केली. अवैधरित्या दारूविक्री करत असल्याचे पोलिसांना कळताच पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकत दारू जप्त केली.
---------------
आसेगावात निर्जंतुकीकरण
वाशिम : कोरोना विषाणूचा संसर्ग आणि पावसाळ्यात पसरणारी घाण लक्षात घेता शेंदुरजना आढाव ग्रामपंचायतने गावात गुरुवारपासून निर्जंतुकीकरण मोहीम सुरू केली. या अंतर्गत ट्रॅक्टरवर फवारणी यंत्र बसवून गावातील सर्व भागांत जंतूनाशक औषधी फवारण्यात येत आहे.
---------------
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
वाशिम: मानोरा तालुक्यात नागरिकांना कोरोनाबाबत संभ्रम निर्माण करणाऱ्या माहितीपत्रकाचे वाटप केले जात आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन तालुका आरोग्य विभागाकडून सोमवारी करण्यात आले.
----------
नागरिकांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप
वाशिम: उंबर्डा बाजार जिल्हा परिषद गटात येणाºया गरजू नागरिकांना जि.प. सदस्य आणि ग्रामपंचायतींच्यावतीने शुक्रवारी मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.
--------
कामरगाव येथील बाजारपेठेत शुकशुकाट
वाशिम : शासनाच्या निर्देशानुसार सोमवारपासून जिल्हा प्रशासनाने नवी नियमावली लागू केली. त्यात कामरगाव येथे सायंकाळी ४ पूर्वीच अत्यावश्यक सेवेची दुकानेवगळता अन्यत्र सर्व दुकाने बंद असल्याने बाजारपेठेत शुकशुकाट जाणवला.