लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या गेल्या काही दिवसांपासून स्थिर आहे. रुग्णवाढीचा आलेख खाली आणण्यासाठी कोरोना संसर्गाची साखळी तोडणे आवश्यक आहे. याकरिता जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करावी, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ६ मे रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी यावेळी ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणीची कार्यवाही, संचारबंदीची अंमलबजावणी, आदी बाबींचा आढावा घेतला.
पालकमंत्री देसाई म्हणाले, कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी नियमांची कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. ई-पासशिवाय कोणालाही जिल्ह्यात प्रवेश देऊ नये. तसेच अत्यावश्यक आणि महत्त्वाचे कारण असेल तरच जिल्ह्याबाहेर प्रवासासाठी ई-पास उपलब्ध करून द्यावा. शहरी व ग्रामीण भागामध्ये परवानगी दिलेली आस्थापना, दुकानांच्या ठिकाणी कोरोना सुरक्षा नियमांचे पालन होईल, कुठेही गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. ग्रामीण भागातील उपाययोजनांवर सुद्धा विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.
जिल्ह्यात सुरु असलेल्या नवीन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाच्या कामाला गती द्यावी. हा प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित झाल्यास जिल्ह्याची ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी मोठी मदत होणार आहे. त्यामुळे या कामांना प्राधान्य देऊन संबंधित एजन्सीकडे सातत्याने पाठपुरावा करावा. तसेच जिल्हा वार्षिक योजनेतून कार्यारंभ आदेश दिलेले ऑक्सिजन कॉन्सट्रेटर, बायपॅप मशीन लवकरात लवकर उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या. वाशिम येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील कोविड हॉस्पिटलमध्ये ७५ ऑक्सिजन बेड व कारंजा उपजिल्हा रुग्णालयात ५० ऑक्सिजन बेड वाढविण्याच्या कार्यवाहीचाही पालकमंत्र्यांनी यावेळी आढावा घेतला. तसेच वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यात वीजपुरवठा खंडित होणे, वृक्ष कोसळणे यासारखे प्रकार घडल्यास तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या.
जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना बाधितांची संख्या स्थिर आहे. तसेच ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होत आहे. जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात केंद्र शासनामार्फत उभारण्यात आलेला ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. वाशिम येथे आणखी ७५ ऑक्सिजन बेड वाढविण्यासाठी आवश्यक सेन्ट्रल ऑक्सिजन पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे, तसेच कारंजा उपजिल्हा रुग्णालयातील सेन्ट्रल ऑक्सिजन पाईपलाईनचे काम सुरु आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पंत म्हणाल्या, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी ग्रामीण भागामध्ये अधिक प्रभावीपणे करण्यावर भर दिला जात आहे. तसेच ४५ वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणासाठी नियोजन करण्यात आले असून त्यानुसार कार्यवाही केली जात आहे.
पोलीस अधीक्षक परदेशी म्हणाले, जिल्ह्यात संचारबंदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींची वाहने जप्त करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. तसेच ई-पास शिवाय कोणालाही जिल्ह्यात प्रवेश करण्यास परवानगी दिली जात नसल्याचे त्यांनी सांगितले.