यावेळी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री देसाई म्हणाले, जिल्ह्यात गेल्या सात दिवसांत १०३३ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची अधिक प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.
अमरावती जिल्हा सीमेवरून वाशिम जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाची सीमेवरच आरोग्य तपासणी होणे आवश्यक आहे. कारंजा, मंगरुळपीर, वाशिम या तालुक्यांमध्ये रुग्णवाढीचा दर अधिक असून चाचण्यांची संख्या वाढवावी लागणार आहे. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक कडक कराव्यात. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन आरोग्य विभागाने आवश्यक औषधी, बेड्स आणि इतर बाबींचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा. कोरोना संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी हाती घेतलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.
...............
बॉक्स :
जिल्ह्यात दैनंदिन १६०० चाचण्या- जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी सांगितले की, कोरोना बाधितांचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. जिल्ह्याला रोज १२६० कोरोना चाचण्या करण्याचे उद्दिष्ट आहे; मात्र सध्या दररोज १५०० ते १६०० चाचण्या होत आहेत. कोरोना बाधितांवर उपचारासाठी जिल्ह्यात सध्या ८९७ बेड्स उपलब्ध आहेत. आज रोजी जिल्ह्यात ५६ बाधित रुग्ण उपचार घेत आहेत, तर ८४१ बेड रिक्त आहेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.