वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधांची अंमलबजावणी जिल्हा प्रशासनाने गुरूवारपासून सुरू केली असली तर शहरातील प्रमुख रस्त्यांवर आणि बाजारपेठेत नेहमीप्रमाणेच नागरिकांची गर्दी गुरूवारी ही दिसून आली. शासनाचे कडक निर्बंध कागदावर तर नागरिक रस्त्यावर अशी अवस्था असल्याने कोरोना संसर्गाचा धोका अजून वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जनजीवन विस्कळीत होत आहे. संपूर्ण राज्यात कोरोनाने कहर केला असून, कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने १४ एप्रिलच्या रात्री ८ वाजतापासून कडक निर्बंध लागू केले. अत्यावश्यक कारणाशिवाय कुणाला बाहेर पडता येणार नाही, एवढेच नव्हे तर हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये पार्सल आणण्यासाठी सुद्धा जाता येणार नाही, असे निर्देश राज्य शासनाने दिलेले आहेत. वाशिम जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी देखील १४ एप्रिल रोजी स्वतंत्र आदेश काढत अत्यावश्यक कारणाशिवाय कुणी रस्त्यावर आढळून आले तर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले. त्यामुळे १५ एप्रिलपासून वाशिम शहरासह रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर, मानोरा शहरातील बाजारपेठेत व रस्त्यांवर फारशी गर्दी राहणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, ही अपेक्षा फोल ठरली असून, शासनाचे कडक निर्बंध कागदावर तर नागरिक रस्त्यावर असल्याचे गुरूवार, १५ एप्रिल रोजी सर्वत्रच दिसून आले. नागरिकांची बेजबाबदार वृत्ती कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढविण्यास कारणीभूत ठरत असल्याचे वारंवार निष्पन्न झाले असतानाही, रस्ते, दुकान, बँका, कार्यालयांमधील नागरिकांची गर्दी कमी होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तुटणार तरी कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वाशिम शहरातील पाटणी चौक स्थित बाजारपेठेत तसेच रस्त्यांवर नेहमीप्रमाणेच गुरूवारी ही नागरिकांची वर्दळ दिसून आली. रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांनी देखील हटकले नसल्याचे दुपारच्या सुमारास दिसून आले. अत्यावश्यक कारणाशिवाय कुणी रस्त्यावर आढळून आले तर दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार, असा इशारा प्रशासनाने दिल्यानंतरही नागरिक बिनधास्त आहेत. नागरिकांचा बिनधास्तपणा हा जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढविण्यास कारणीभूत ठरला तर नवल वाटायला नको.
000
बॉक्स.....
उन्हात सावलीचा आधार !
वाशिम शहरात पाटणी चौकात दुपारी २ वाजताच्या सुमारास अनेक नागरिक बाजारपेठेत तसेच रस्त्यावर फिरताना आढळून आले. काही नागरिक तर उन्हापासून बचाव म्हणून एका दुकानाच्या पायरीवर एका रांगेत बसले होते. यावरून कोरोनाच्या महामारीतही नागरिक किती बिनधास्त वावरत आहेत, याची प्रचिती येते. या नागरिकांना ना पोलिसांनी हटकले; ना अन्य कुण्या विभागाच्या चमूकडून विचारणा झाली नाही. हे चित्र असेच राहिले तर शासनाचे कडक निर्बंध ३० एप्रिलपर्यंत कागदावरच राहतील, यात शंका नाही.
०००
विनाकारण घराबाहेर पडल्यास दंडात्मक कारवाई
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात १ मे रोजीच्या सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पुढील १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. या कालावधीत सर्व नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून प्रशासनाला सहकार्य करावे. अत्यावश्यक कारणाशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये, प्रशासनाकडून देण्यात येत असलेल्या सूचनांचे पालन करावे. घरी राहून स्वतःच्या व कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी केले आहे. तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाईचे आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.