वाशिम - स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत ३० एप्रिल रोजी वाशिम जि. प. च्या गुड मॉर्निंग पथकाने मंगरुळपीर तालुक्यातील दस्तापुर, वरुड, चांदई, लावणा, कोठारी आणि चेहल या गावामध्ये भेटी देऊन लोटाबहाद्दरांविरूद्ध कारवाई केली. सकाळी साडे पाच सहाच्या दरम्यान वाशिम जि. प. च्या दोन पथकाने विविध गावात जाऊन ऊघड्यावर शौचास जाणाऱ्यांची धरपकड केली.वरुड खु येथील राजु धोंडु भगत याला पथकाने पकडल्यावर त्याच्या कुटुंबाने आठ दिवसात शौचालय बांधुन वापरण्याचे कबुल केल्याने त्याला सोडुन दिले. मात्र याच गावातील खंडु शंकर गव्हाणे याने पथकासोबत हुज्जत घातल्याने त्याला मंगरुळपीर पोलीस स्टेशनला आणुन पोलीसांच्या हवाली केले. दस्तापुर येथील तीन व्यक्तींना पथकाने पकडले. या तिघांना गाडीत टाकुन गोलवाडी फाट्यावर आणले. त्यांनी शौचालय वापरण्याची शपथ घेऊन पथकासमोर दिलगिरी व्यक्त केल्याने त्यांना सोडुन दिले. पथकात उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, लेखाधिकारी विनायक साने, माहिती व संवाद सल्लागार राम श्रृंगारे, तालुका समन्वयक अभिजित गावंडे, ज्ञानेश्वर महाले, ग्रामसेवक विश्वनाथ व्यवहारे, विष्णु सावके, एस. एम शिंदे यांचा समावेश होता.
गुड मॉर्निंग पथकातर्फे धडक कारवाया
By admin | Published: April 30, 2017 2:10 PM