लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळपीर : तालुक्यातील झोलेबाबा चिखली येथे सुरू असलेल्या बैलांच्या बेकायदा शर्यतीवर मंगरूळपीरपोलिसांनी धडक कारवाई करित मुख्य आयोजकांसह २१ आरोपींना अटक करून त्यांच्याविरूद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ आॅगस्ट रोजी चिखली येथील रमेश पवार यांच्या शेतात बेकायदेशीररित्या बैलांच्या धावण्याची शर्यत सुरू होती. त्याठिकाणी पंचासमक्ष जाऊन स्पर्धा भरविणारा मुख्य आयोजक गजानन वैजनाथ हापसे आणि शंकर अनंतराव जुंगाडे (दोघेही रा. शेलुबाजार) हे बैलांना रिंगीला (दोन चाकी गाडी) जुंपवून शर्यत लावताना आढळून आले. जी बैलजोडी १०० मीटरचे अंतर कमीत कमी वेळेत पूर्ण करेल, ती या स्पर्धेत जिंकून ४० हजार रुपयांचा इनाम पटकावेल, असे ठरले होते. त्यासाठी प्रत्येक बैलजोडी मालकाकडून ५ हजार रुपये घेतले जात असल्याच्या पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यावरून पोलिसांनी धडक कारवाई करित स्पर्धास्थळावरून १६ बैल (किंमत ९ लाख ७० हजार), चार रिंगी (किंमत ४० हजार), ८ वाहने (किंमत २० लाख), मोबाईल, बैलांना टोचण्यासाठी असलेल्या कुराणी असा एकंदरित ३० लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी मुख्य आयोजकांसह २१ आरोपींना अटक करण्यात आली आहे. संबंधितांविरूद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ), प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम कलम ११, मोटार वाहन कायदा कलम ८३/१७७ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.या कारवाईत मंगरूळपीरचे ठाणेदार विनोद दिघोरे, पोलिस उपनिरीक्षक मंजुषा मोरे यांच्यासह पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.
बैलांच्या बेकायदा शर्यतीवर धडक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 3:01 PM