रिसोड : आधीच गरिबीत जीवन जगत असलेल्या भूमिहीन अढाव कुटुंबावर संकट ओढवले आहे. २१ वर्षीय पवन अढाव याच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या आहेत. या कुटुंबाकडे पैशांचा अभाव आहे. अशा स्थितीत त्याच्य आयुष्यासाठी कुटुंबाची धडपड सुरू आहे. रिसोड तालुक्यातील जांब अढाव येथील रहिवासी नथ्थूजी अढाव हे व्यवसायाने शिंपी असून, त्यांनी गावातच दुकान थाटले आहे. आपल्या कुटुंबाचे कसेबसे पालनपोषण करीत असतानाच त्यांचा मुलगा पवन याच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या आहेत. पवन सध्या उपचारासाठी नागपूरच्या श्रवण हॉस्पिटलमध्ये भरती आहे. त्याची शस्त्रक्रिया करणे गरजेचे असून, त्यासाठी जवळपास सात लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे सदर कुटुंबावर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. आजपर्यंत अढाव कुटुंबीयांनी दोन ते तीन लाख रुपये पवनसाठी खर्च केले आहेत. सध्या तो डायलिसीसवर आहे. नागपूर येथे ऑपरेशनसाठी नंबर लावला आहे. तथापि, खर्च झेपत नसल्यामुळे कुटुंब चिंतेत आहे. दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात द्यावा, असे आवाहन केले आहे.
दोन्ही किडनी निकामी असलेल्या युवकाची जगण्यासाठी धडपड
By admin | Published: October 02, 2015 2:14 AM