वाशिम : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानअंतर्गत कुटुंबांच्या आरोग्य व पोषणाचा दर्जा सुधारण्यासाठी ‘माझी पोषण परसबाग विकसन’ मोहीम सुरू करण्यात आली आहे. १५ जून ते १५ जुलै २०२१ या कालावधीत उमेद सेंद्रिय पोषण परसबागा तयार केल्या जाणार आहेत. जिल्ह्यात या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला असून, जिल्ह्यासाठी ४५०० पोषण परसबागांचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले असून, ५ दिवसांतच ५२८ बागांची निर्मिती करण्यात आली आहे. यासाठी उमेदअंतर्गत कार्यरत कर्मचारी व संसाधन व्यक्ती यांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण घेण्यात आले.
वाशिम जिल्ह्यात या सेंद्रिय पोषण परसबाग विकसन मोहिमेसाठी ४५०० कुटुंबांमध्ये पोषण परसबाग तयार करण्यात येणार असल्याचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सुधीर खुजे यांनी सांगितले. यासाठी जिल्हाभरातील सर्व उमेद स्टाफ व संसाधन व्यक्ती यांचे प्रशिक्षण झाले असून गावपातळीवर कार्यरत ९३६ संसाधन व्यक्तींच्या माध्यमातून ४५०० सेंद्रिय पध्दतीने पोषण परसबागांची निर्मिती वाशिम जिल्ह्यामध्ये केली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंतड व प्रकल्प संचालकांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे.
-------
वार्षिक ३.१५ कोटी रुपयांची बचत
जिल्ह्यात माझी पोषण परसबाग विकसन अभियानांतर्गत निर्मित पोषण परसबागांच्या माध्यमातून प्रति कुटुंबाचा रसायनमुक्त भाजीपाला वरील वार्षिक सरासरी सहा ते आठ हजार रुपये बचत होणार आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील ४५०० कुटुंबांमध्ये कमीत कमी ३ कोटी १५ लाख रुपयांची वार्षिक बचत होणार असून, विषमुक्त भाजीपाला सेवनामुळे त्यांचे आरोग्यही अबाधित राहणार आहे.
---------------
तालुकानिहाय उद्दिष्ट व प्रत्यक्ष निर्मिती
तालुका उद्दिष्ट निर्मिती
वाशिम ७५० ११०
रिसोड ७५० १२३
मानोरा ७५० ८८
कारंजा ७५० ७७
मं.पीर ७५० ६७
मालेगाव ७५० ६३
--------------------------
एकूण ४५०० ५२८
---------
कोट : ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्ह्यात १५ जूनपासून पोषण परसबाग विकसन मोहिमेला मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रकल्प संचालकांच्या मार्गदर्शनात प्रारंभ करण्यात आला आहे. या मोहिमेत जिल्ह्यासाठी ४५०० बागांचे उद्दिष्ट असून, ५२८ बागांची निर्मितीही करण्यात आली आहे.
- सुधीर खुजे, जिल्हा अभियान व्यवस्थापक