शासनाच्या २९ सप्टेंबर, २०२०च्या परिपत्रकानुसार सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करण्याच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. हे परिपत्रक निर्गमित करून ४ महिन्यांच्या कालावधी उलटला, तरी विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी संख्येत वाढ होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. प्रत्यक्षात जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची पदे निश्चित करताना फक्त आधार नोंदणीकृत विद्यार्थ्यांची संख्याच ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षण उपसचिवांनी या संदर्भात १० जानेवारी रोजी सर्व जिल्हा परिषदेच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून शासन परिपत्रकान्वये विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करण्याबाबत सूचना देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, शाळांनी या प्रक्रियेला वेगही दिला, परंतु याच काळात कोरोना संसर्ग उफाळल्याने या प्रक्रियेत खोळंबा निर्माण झाला. आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.
------
मार्च, २०२१ पर्यंत होती मुदत
राज्यातील विद्यार्थ्यांची शासन परिपत्रकान्वये नोंदणी करण्यासाठी टप्प्याटप्प्याने कार्यक्रम राबवून, दर महिन्याचा अहवाल शासनाकडे सादर करण्यासह मार्च, २०२१ पर्यंत शंभर टक्के विद्यार्थ्यांची नोंदणी होईल, अशा स्पष्ट सूचना शिक्षण उपसंचालकांनी दिल्या होत्या. त्याची अंमलबजावणी सर्वत्र करण्यातही आली, परंतु आधार नोंदणी पूर्ण होऊ शकली नाही.
--------
कोट : शासन परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करण्यासंदर्भातील सूचना सर्वच तालुकास्तरावर देण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेचा नियमित आढावा घेण्याचे निर्देशही गटशिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहेत. आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
-गजाननराव डाबेराव,
प्रभारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
जि.प. वाशिम