लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम येथे शिकत असलेल्या एका १९ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीविरुद्ध यवतमाळ जिल्ह्यातील महागाव पोलीस स्टेशनला विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्याचे घटनास्थळ वाशिम असल्याने महागाव पोलिसांनी बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास प्रकरण वाशिम शहर पोलिसांकडे वर्ग केले. पीडित विद्यार्थिनीच्या फिर्यादीनुसार, ती इंदिरा नगर महागाव जि. यवतमाळ येथील रहिवासी असून, वाशिम येथे शिक्षण घेत आहे. विद्यार्थिनीला दिनेश गुरव पाटील रा.सांगली याने काही महिन्यांपूर्वी वाशिम येथील एका हॉटेलमध्ये बोलाविले होते. या हॉटेलमधून दुसऱ्या हॉटेलमध्ये नेले आणि पिण्याच्या पाण्यामध्ये गुंगीचे औषध टाकून लैंगिक अत्याचार केला. याबाबतचा व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेल केले तसेच व्हिडिओ वायरल करतो, अशी धमकी दिली. याप्रकरणी फिर्यादीने महागाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. घटनास्थळ वाशिम असल्याने महागाव पोलिसांनी प्रकरण वाशिम पोलिसांकडे वर्ग केले. वाशिम पोलीस पुढील तपास करीत आहेत.