खासगी शाळांच्या तुलनेत सरकारी शाळांमध्ये फारशा भौतिक सुविधा उपलब्ध नसतात, अशी ओरड नेहमीच होते. पूर्वीच्या तुलनेत आता जिल्हा परिषद शाळांमध्येही बऱ्यापैकी भौतिक सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये मुख्याध्यापक, शिक्षकांसाठी स्वतंत्र कक्षाची व्यवस्था नाही. खासगी शाळांमध्ये मुख्याध्यापक, शिक्षकांसाठी स्वतंत्र कक्षाची व्यवस्था असते. शाळेत वर्ग घेतल्यानंतर शिक्षकाला काही काळ विश्रांतीची गरज असते. तसेच शाळेतील महत्त्वाची कागदपत्र ठेवण्यासाठी आणि शाळेचे व्यवस्थापन हाताळण्यासाठी मुख्याध्यापकाला वेगळा कक्ष असणे बंधनकारक आहे. परंतु जिल्हा परिषदेच्या जवळपास ४०२ शाळांमध्ये मुख्याध्यापकांसाठी स्वतंत्र कक्षच नाही.
०००
शाळांमध्ये अडचणींचा डोंगर
बहुतांश शाळांमध्ये मुख्याध्यापकांचा प्रभार सहायक शिक्षकांकडे असल्याने अध्यापनासोबतच कार्यालयीन कामकाज सांभाळावे लागते. एकाच शिक्षकाला दोनपेक्षा अधिक वर्ग सांभाळावे लागतात. शाळांमध्ये स्टाफ रुम नसल्याने शिक्षकांना शालेय विषयांवर एकत्र बसून चर्चा करता येत नाही. स्टाफची बैठक घ्यावयाची असल्यास त्यांना शाळेत मैदानामध्ये एकत्र यावे लागते किंवा वर्ग सुटण्याची प्रतीक्षा करावी लागते. स्वतंत्र कक्ष नसलेल्या ठिकाणी मुख्याध्यापकांना शालेय उपयोगी दस्तऐवज ठेवण्याकरिता अडचणी येतात. वर्गात महत्त्वाची कागदपत्र ठेवून कामकाज करता येत नाही. वर्गखोलीतील विद्यार्थ्यांच्या किलबिलाटामुळे कामकाजही पूर्णत्त्वास जात नाही.
००
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ७७० शाळा आहेत. जवळपास ३६८ शाळांमध्ये मुख्याध्यापक, शिक्षकांसाठी स्टाफ रुमची व्यवस्था आहे. उर्वरित ठिकाणी ही व्यवस्था नाही. तथापि, मुख्याध्यापक, शिक्षकांना फारशा अडचणी येत नाहीत.
- अंबादास मानकर,
शिक्षणाधिकारी, वाशिम
००
खासगी शाळांमध्ये व्यवस्था
जिल्हा परिषद शाळेचा अपवादवगळता खासगी प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये मुख्याध्यापकांसाठी स्वतंत्र कक्ष, शिक्षकांसाठी स्टाफ रुमची व्यवस्था असते. जिल्हा परिषदेच्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राचार्य, मुख्याध्यापकांसाठी स्वतंत्र वर्ग तसेच शिक्षकांसाठी स्टाफ रूमची व्यवस्था आहे, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले. ज्या प्राथमिक शाळांमध्ये मुख्याध्यापकांचे पद मंजूर आहे, तेथे मुख्याध्यापकांसाठी स्वतंत्र कक्षाची व्यवस्था आहे, असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले. आहे त्या खोलीत शैक्षणिक दस्तऐवज सांभाळून ठेवण्याची कसरत मुख्याध्यापकांना करावी लागत आहे.