वाशिम : इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू झाल्या आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग तीन तासापर्यंत घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या असल्या तरी या नियमाचे शहरातील काही शाळा उल्लंघन करीत असल्याचे दिसून येत आहे. शाळेत येतांना विद्यार्थ्यांनी पाण्याच्या बाटलीव्यतिरिक्त काही न आणण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे विद्यार्थी सकाळी ७ वाजल्यापासून १२ वाजेपर्यंत उपाशी राहता आहेत. शिक्षक मात्र हाॅटेलवर जाऊन मस्त नाष्टा करीत असल्याचे चित्र आहे.
शाळेत येताना विद्यार्थ्यांना जेवणाचा डबा न आणण्याचे अनेक शाळांनी सांगितले आहे. शाळेत पूर्वी खिचडीचे वाटप व्हायचे. विद्यार्थी डबा घेऊन जायचे. परंतु काेराेना संसर्ग पाहता हे बंद केले. शिक्षण विभागाने इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांची शाळा तीन तास घ्यावी. परंतु काही शाळा ४ ते साडेचार तास घेण्यात येतात. मुलांना सकाळी ७.३० वाजता शाळेत यायचे म्हटल्यास ७ वाजेपर्यंत तयार हाेऊन निघावे लागत असल्याने ते दूध, बिस्किट याव्यतिरिक्त काहीही सेवन करीत नाहीत. घरी पाेहोचेपर्यंत १२ वाजत असल्याने चिमुकले भुकेने कासावीस हाेत असल्याचे काही पालकांनी सांगितले.
---------------
शिक्षण विभागाकडून केवळ तीन तास शाळा घेण्याच्या सूचना
काेराेना संसर्स पाहता शाळा काही नियमावर सुरू करण्यात आल्या आहेत. लहान मुलांची शाळा केवळ तीन तासपर्यंत घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. परंतु अनेक शाळांकडून त्या पाळल्या जात नाहीत.
............
आठवी ते दहावीचे विद्यार्थ्यांच्या सोयीचे
जिल्ह्यात दाेन सत्रात शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. काही शाळांनी सकाळी साडेसात ते साडे अकरा व १२ ते ३ अशी शाळेची वेळ ठेवली आहे. आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची वेळ १२ वाजताची असल्याने ते जेवण करून शाळेत जात असल्याने त्यांच्या साेयीची वेळ आहे, परंतु चिमुकल्या विद्यार्थ्यांचे काय, असा प्रश्न आहे.
.............
शाळांची चाैकशी केली जाईल
सर्व शाळांना तीन तास वर्ग घेण्याचे सुचित करण्यात आले आहे. त्याव्यतिरिक्त काही शाळा जास्त वेळ वर्ग घेत असतील तर त्यांची चाैकशी केली जाईल.
अंबादास मानकर,
शिक्षणाधिकारी, वाशिम
..........
घरी आल्यावर मुले थकून जातात...
पहाटे उठून मुलांची तयारी करा, त्यांची इच्छा नसताना बिस्कीट, दूध द्यावे लागत आहे. शाळेतून आल्यावर मुले थकून जात असल्याचे दिसून येत आहे.
बालाजी गाेटे
पालक, वाशिम
..........
आई मला काही खायला देगं...
पालक मुलाला शाळेतून घरी आणल्याबराेबर मुलांचा एकच प्रश्न असताे, आई काही तरी खायला दे गं... भूक लागली. खेळायला आणि जेवायलाही मिळत नाही.
प्रकाश मानवतकर
पालक, वाशिम
............
शाळेची वेळ ९ वाजता करणे गरजेचे
सकाळी उठून मुले दूधसुध्दा पिण्याचा कंटाळा करतात. सकाळी ९ वाजता शाळा ठेवल्यास मुलांना किमान पाेटभर नाष्टा करून शाळेत पाठविले जाऊ शकते.
विजय कुचेकर
पालक, वाशिम
.........