कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. परीक्षासुद्धा रद्द झाल्या आहेत. मात्र, बाल वैज्ञानिकांचा राष्ट्रीय मेळावा ऑनलाईन भरत आहे. यामध्ये वाशिम जिल्ह्यामधील कारंजा तालुक्यातील आप्पास्वामी विद्यालय, वढवी ही एकमेव शाळा सहभागी होणार आहे. बालवैज्ञानिकांनी तयार केलेल्या वैज्ञानिक प्रतिकृतींच्या प्रयोगाचे प्रदर्शन देशातील आसाम, दिल्ली अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये होत होते. मात्र, यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता प्रथमच ऑनलाईन पद्धतीने प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील एकमेव शाळा आप्पास्वामी विद्यालय, वढवीचा विद्यार्थी अंकुश भागवतने सहभाग घेऊन जिल्ह्याच्या इतिहासात मानाचा तुरा खोवला आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांनी पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तिंना वाचवणारे जीव संरक्षक यंत्र निर्माण केले आहे . दरवर्षी पावसाळा आला की, पूर परिस्थिती निर्माण होते. यामध्ये अनेक जीव जातात. हे जीव वाचवण्यासाठी ट्यूबमध्ये यांत्रिक बदल करून या ट्यूबला मोटर व फॅन जोडला जाणार आहे. रिमोटच्या साहाय्याने डुबणाऱ्या व्यक्तीपर्यंत ट्यूब पोहोचेल व डुबणाऱ्या व्यक्तिचा व स्वतःचा जीव वाचवेल. या जीवसंरक्षक यंत्राचे प्रात्यक्षिक तुळजापूरनजीकच्या धरणात दाखविण्यात आले.
वढवी येथील विद्याथ्याने केली जीवसंरक्षक यंत्राची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 4:41 AM