वाशिम : सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचे ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येण्याची शक्यता आहे. आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांची ऐनवेळी धावपळ होऊ नये म्हणून आतापासूनच जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी सदस्य तथा उपायुक्त डॉ. सी. के. कुलाल यांनी केले.
व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. हे प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी ज्या जिल्ह्यातून जातीचा दाखला प्राप्त केला आहे, त्या जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज करावा, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्यावतीने करण्यात आले आहे. जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज केल्यानंतर नियमानुसार तीन महिन्यांच्या आत प्रमाणपत्राबाबत समिती निर्णय घेते. जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळावा तसेच जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळण्यापासून वंचित राहू नये, यासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्याप वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर केला नसल्यास तातडीने ज्या जिल्ह्यातून जातीचा दाखला प्राप्त केला आहे, त्या जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा, असे आवाहन डॉ. सी. के. कुलाल यांनी केले.