वाशिम: जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती २ वर्षांपासून मिळालीच नाही. त्यामुळे शैक्षणिक साहित्य खरेदी करून पुढील शिक्षण घेणे त्यांना अवघड जात आहे. विशेष म्हणजे काही विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळाली असल्याने शिष्यवृत्तीपासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांच्या मनात या योजनेविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.शासन दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास घडवून आणण्यासाठी त्यांना मोफत गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचे वितरण करते, तर त्याच विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी समाज कल्याण विभागामार्फत देण्यात येणारी शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नाही. मागास, गोरगरीब विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती देण्यात शिक्षण विभागही अयशस्वी ठरत आहे. जिल्ह्यातील अशा शेकडो विद्यार्थ्यांना दोन वर्षांपासून शिष्यवृत्तीच मिळाली नाही. एकाच शाळेत शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली, तर त्याच शाळेतील इतर पात्र विद्यार्थी मात्र वंचित असल्याने वंचित विद्यार्थी व पालक संभ्रमात पडले आहेत.समाज कल्याण आणि शिक्षण विभागाने याची दखल घेऊन वंचित विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तात्काळ त्यांच्या बँक खात्यावर जमा करावी, अशी मागणी विद्यार्थी व पालक करीत आहेत. दरम्यान, या संदर्भात समाज कल्याण विभागाशी संपर्क साधला असता ज्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित असेल त्या विद्यार्थ्यांनी रितसर तक्रार करून माहिती दिल्यास कारणांचा शोध घेऊन त्यांची शिष्यवृत्ती खात्यात जमा करण्याचा मार्ग मोकळा करता येईल, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांना दोन वर्षांपासून शिष्यवृत्तीची प्रतीक्षा, समाज कल्याण व शिक्षण विभाग अनभिज्ञ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2018 5:50 PM