माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त ८ ते १४ नोव्हेंबर २०२० दरम्यान आयोजित बाल सप्ताहात शाळांकडून विविध उपक्रम राबविण्यात आले. हे उपक्रम ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात आले. यात विद्यार्थ्यांनी निबंध लेखन, वक्तृत्व, व्हिडिओ मेकिंगसह विविध स्पर्धांत ऑनलाइन पद्धतीने सहभाग घेतला. शिक्षकांमार्फत त्यांच्या विद्यार्थ्यांची छायाचित्रे # बालदिवसी २०२० हे हॅशटॅग वापरून सोशल मीडियावर अपलोड करण्यात आले. यात तालुकास्तर, जिल्हास्तर आणि राज्यस्तर स्पर्धेचा समावेश होता. वाशिम जिल्ह्यातील २७ विद्यार्थ्यांनीही या स्पर्धेत सहभाग घेतला. आता ही स्पर्धा आटोपून दोन महिने उलटले तरी निकाल आणि बक्षीस वितरणाची प्रक्रिया प्रलंबित असल्याने बालसप्ताह स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमध्येही यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. शिवाय राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी जिल्ह्यातील काही विद्यार्थी पात्र ठरले का, ही माहितीसुद्धा शिक्षण विभागाकडे नसल्याचे या संदर्भातील माहितीवरून कळले आहे.
---------
निकालाबाबत संभ्रमच
शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार वाशिम जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सर्व शाळांना बालसप्ताह साजरा करण्याच्या आणि विविध उपक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या. त्याची अंमलबजावणी शाळांनी केली. कोरोना पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ग भरविले जात नसल्याने बालसप्ताहानिमित्तची स्पर्धाही शाळांनी ऑनलाइन पद्धतीनेच घेतली. विद्यार्थ्यांना विविध विषय देऊन त्यांचे प्रस्ताव आणि व्हिडिओ ऑनलाइन पद्धतीनेच घेण्यात आले; परंतु या स्पर्धेचा निकाल अद्यापही जाहीर झाला नसल्याचे कळले. त्याबाबत शिक्षण विभागाशी संपर्क साधून कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, स्पर्धेच्या निकालास विलंब का झाला किंवा तो जाहीर झाला का, ही माहिती त्यांना नसल्याचे कळले. त्यामुळे निकालाबाबत संभ्रमच आहे.
----------
कोट: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून ऑनलाइन पद्धतीने बालसप्ताहानिमित्त स्पर्धांचे आयोजन केले होते. अर्ज प्रक्रियाही ऑनलाइन पद्धतीनेच पार पडली. यात तालुका आणि जिल्हा स्तरावर काही विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेच्या निकालास किंवा बक्षीस वितरणास का विलंब झाला, त्याबाबत आपणांस निश्चित काही सांगता येणार नाही.
-अंबादास मानकर,
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प. वाशिम.
------
स्पर्धेत सहभागी विद्यार्थी
जिल्हास्तर १८
तालुकास्तर ९
राज्यस्तर ००