लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :२७ जूनपासून प्राथमिक व माध्यमिक शाळा उघडणार असून, पहिल्याच दिवशी पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाणार आहे. दरम्यान, अद्याप ३० टक्के विद्यार्थ्यांचे संयुक्त बँक खाते अप्राप्तच असल्याने विद्यार्थ्यांना जुन्या गणवेशावरच शाळेत जावे लागणार आहे.दरवर्षी विदर्भातील शाळा २६ जूनपासून सुरू होतात. यावर्षी २६ जूनला ह्यरमजान ईदह्णची सुट्टी असल्याने २७ जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. गत पाच वर्षांपासून शाळेच्या पहिल्याच दिवशी गुलाब पुष्प देऊन पहिलीत प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाते. यावर्षीदेखील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव कार्यक्रम घेतला जाणार आहे. शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा, खासगी अनुदानित शाळेत शिकणाऱ्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाणार आहे. जिल्ह्यातील एकूण १ लाख ४२ हजार ७६३ विद्यार्थ्यांना सात लाख ९१ हजार ३६७ पाठ्यपुस्तके प्राप्त झालेली असून, यापूर्वीच तालुका स्तरावर पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आलेले आहे. पहिल्या दिवशी शाळेत हजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत. गणवेशदेखील पहिल्याच दिवशी देण्याचे नियोजन करण्यात आले होते. यावर्षी गणवेशाऐवजी विद्यार्थी व त्याच्या आईचे संयुक्त बँक खाते क्रमांकावर गणवेशाची रक्कम जमा करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे बँक खाते क्रमांक शिक्षण विभागाने मागविले होते. जिल्ह्यात जवळपास ८५ हजार विद्यार्थ्यांना गणवेशाचा लाभ मिळणार असून, त्यात ४५ हजार मुली आणि ३० हजार मुलांचा समावेश आहे. अनुसूचित जाती-जमाती व दारिद्रय रेषेखालील विद्यार्थ्यांना गणवेश पुरविला जातो. वारंवार आवाहन करूनदेखील ३० टक्के विद्यार्थ्यांचे संयुक्त बँक खाते क्रमांक शिक्षण विभागाला प्राप्त झाले नाहीत. ८५ हजार विद्यार्थ्यांपैकी २५ हजार ५०० विद्यार्थ्यांनी बँक खाते क्रमांक सादर न केल्याने गणवेशाची रक्कम जमा करता आली नाही. बँक प्रशासनदेखील झिरो बॅलन्स खाते उघडून देण्यास उत्सुक नसल्याचा दावा पालकांनी केला. प्रती गणवेश २०० रुपये याप्रमाणे दोन गणवेशाची रक्कम ४०० रुपये मिळणार आहे. झिरो बॅलन्स खाते उघडून देण्यास अनेक विद्यार्थ्यांना नकार मिळाल्याने ४०० रुपयांसाठी बँक खाते उघडण्याला ५०० रुपये खर्च कशाला करावा? असा सवाल पालकांनी उपस्थित केला.
विद्यार्थी जुन्याच गणवेशात!
By admin | Published: June 27, 2017 9:33 AM