वाशिम : मानव विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील ३,७३२ मुलींची सायकल अनुदानासाठी निवड झाली आहे. या विद्यार्थिनींना प्रत्येकी ५ हजार रुपयांचे अनुदान देण्यासाठी १ कोटी ८६ लाख ६० हजार रुपयांचा निधी तालुकास्तरावर वर्ग करण्यात आला आहे. यामुळे या विद्यार्थिनींची पायपीट थांबणार असून, त्यांना सायकल खरेदीसाठी ५ हजार रुपये मिळणार आहेत.
मानव निर्देशांकात माघारलेल्या तालुक्यांमध्ये मानव विकास कार्यक्रम राबविला जात आहे. या अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांमध्ये आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या व शाळेपासून ५ कि. मी. अंतरापर्यंत राहणाऱ्या गरजू मुलींना सायकलचे वाटप करण्यासाठी अनुदान दिले जाते. शैक्षणिक वर्ष २०२३-२४साठी मानव विकास विभागाने निधीची तरतूद केली होती. शिक्षण विभागाने प्रस्ताव मागवून पात्र विद्यार्थिनींना अनुदान वाटप करण्याबाबतची आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना मानव विकास विभागाने शैक्षणिक सत्र सुरू होताच दिल्या होत्या. त्यानुसार माध्यमिक शिक्षण विभागाने तालुका गटशिक्षणाधिकारी कार्यालय स्तरावरून पात्र विद्यार्थिनींचे प्रस्ताव मागविले होते. शिक्षण विभागाने २,४०० विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्याचे नियोजन केले होते. मात्र, प्रत्यक्षात अर्ज अधिक संख्येने आल्याने त्यानुसार निर्णय घेऊन सर्व पात्र विद्यार्थिनींना सायकलसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेण्याचे ठरले होते. त्यामुळे उद्दिष्टापेक्षा अधिक अर्ज आले, तरी त्या सर्व पात्र अर्जांनुसार विद्यार्थिनींची सायकल अनुदानासाठी निवड करण्यात आली. वाशिम, रिसोड, मानोरा आणि मालेगाव तालुक्यांमधील ३७३२ मुलींच्या खात्यावर अनुदानाची रक्कम वर्ग केली जात आहे.
१.८६ कोटींचा निधी वितरित
प्रति विद्यार्थिनी ५ हजार रुपये याप्रमाणे मानव विकास विभागाकडून १ कोटी ८६ लाख ६० हजार रुपयांचा निधी माध्यमिक शिक्षण विभागाला मिळाला होता. त्यानुसार पात्र मुलींच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यासाठी हा निधी तालुक्याला वर्ग करण्यात आला. त्यानुसार वाशिम तालुक्यातील १२९५ विद्यार्थिनींसाठी ६४ लाख ७५ हजार रुपये, रिसोड तालुक्यातील ९३७ मुलींसाठी ४६ लाख ८५ हजार रुपये, मालेगाव तालुक्यातील ४३४ मुलींसाठी २१ लाख ७० हजार रुपये आणि मानोरा तालुक्यातील १०६६ विद्यार्थिनींसाठी ५३ लाख ३० हजार रुपये अशा एकूण ३७३२ विद्यार्थिनींसाठी १ कोटी ८६ लाख ६० हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.