लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर विद्यार्थ्यांना आॅनलाईन पद्धतीने शिक्षणाचे धडे दिले जात आहेत; परंतू ग्रामीण भागातील अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांकडे अॅन्ड्राईड मोबाईल, संगणक, लॅपटॉप नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना लॅपटॉप, संगणक मोफत देण्यात यावे, अशी मागणी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा वाशिमच्यावतीने २७ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.कोरोना विषाणूच्या संसर्गापासून विद्यार्थ्यांना सूरक्षित ठेवण्यासाठी आॅनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकविण्यात येत आहे. ज्यांच्याकडे संगणक, मोबाईल, लॅपटॉपची सुविधा आहे त्यांच्यासाठी आॅनलाईन वर्ग सुलभ व फायदेशीर आहेत. परंतू अनेक गरीब विद्यार्थ्यांकडे कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना शिकवणी वर्गात बसण्याची योग्य प्रकारे संधी साधता येत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. गोरगरीब विद्यार्थ्याला संगणक किंवा लॅपटॉप मोफत देण्याची मागणी भारतीय बौद्ध महासभेचे वाशिम जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ भगत, हरीचंद्र पोफळे, संध्याताई पंडित, देवानंद वाकोडे, गोविंदराव इंगळे, दिलीप गवई आदींनी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे निवेदन पाठविण्यात आले.(प्रतिनिधी)
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे मोबाईल, संगणकाचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 11:41 AM