लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : अनुदानासह अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळांचे प्राध्यापक ९ आॅगस्टपासून बेमुदत संपावर असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून यावर काहीतरी तोडगा काढण्याच्या मागणीसाठी आसेगावपेन येथील विद्यार्थ्यांनी १३ आॅगस्ट रोजी रिसोड तहसिल कार्यालय गाठत तहसिलदारांसमोर आपल्या व्यथा मांडल्या.अनेक उच्च माध्यमिक शाळांना अनुदान नाही. त्यामुळे या शाळेवरील शिक्षकांसमोर आर्थिक पेच निर्माण झाला. याकडे शासन व शिक्षण विभागाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक कृती समितीने ९ आॅगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात सहभागी होत रिसोड तालुक्यासह जिल्ह्यातील विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळांवरील शिक्षकांनी काम बंद ठेवले. यामुळे विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तालुक्यातील आसेगाव येथील प्रियदर्शनी कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक संपावर गेले आहेत. या संपामुळे अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली आहे. यामुळे अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षकांच्या विविध मागण्यासंदर्भात शासनाने लक्ष घालून हा प्रलंबित प्रश्न सोडवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे, अशी मागणी करतानाच रिसोड तहसिलदार राजेश सुरडकर यांच्यासमोर विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. पुजा काशिनाथ खानझोडे, नेहा विठ्ठल रेखे, कविता सुधाकर पडघण, शुभांगी रमेश कुटे, सपना पांडुरंग खंदारे, वृषाली बळवंता अंभोरे, वैष्णवी लोडजी धूड, वंदना शंकर मानोरकर, दिपाली केशव खानझोड, शिल्पा सिताराम खानझोडे, शंकर राजाराम खानझोडे आदी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थी धडकले तहसिल कार्यालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 4:09 PM