- नरेश आसावा
इंझोरी (मानोरा) : वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील इंझोरी या छोट्याशा खेडेगावातील वर्ग ३ ते ६ वीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी गावाच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला आहे. गावातील विविध चौकांत पृष्ठाच्या डब्यापासून तयार केलेल्या कचरापेट्या त्यांनी ठेवल्या असून, दररोज सायंकाळी ते या कचरापेट्या साचलेल्या कचऱ्याची गावबाहेर नेऊन विल्हेवाट लावतात.
वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात असलेल्या इंझोरी येथील जिल्हा परिषद शाळेत वर्ग ३ ते ६ वीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या चिमुकल्यांना मात्र राज्य आणि केंद्र शासनाच्या स्वच्छता अभियानाचा उद्देश कळला आहे. केवळ हागणदरीमूक्त गाव करून स्वच्छता अभियानाची संकल्पपूर्ती होणार नसून, आपले संपूर्ण गाव घाण, कचरारहित झाले, तरच शासनाचा उद्देश सफल होईल. ही बाब लक्षा घेऊन त्यांनी एक अभिनव उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. ओम भिमराव अलाटे, सुरेंद्र श्रीधर मंजुरकार, शाम माणिक खराटे, प्रथमेश हिम्मत लायबर, आशिष देवानंद आडोळे, मनिष प्रशांत काठोड, आदित्य संजय मासोतकार, आशिष रमेश अलाटे, करण मारोती विरयकार, राहुल राजू गोरे, ओम नारायण भोजापुरे आणि अरबाज खान कलिम खान, अशी या चिमुकल्यांची नावे असून, गाव स्वच्छतेसाठी ही मुले एकत्र आली. ही मुले गावातील विविध दुकांनांत फिरली आणि व्यावसायिकांकडून पृष्ठाचे रिकामे डबे घेत. त्यावर कचरापेटी असे लिहून त्या पेट्या गावातील विविध चौकांत आणि कचरा अधिक साचणाºया जागेवर सुरक्षीत राहतील, अशा पद्धतीने बांधून ठेवल्या. या कचरापेट्यात जमा झालेला कचरा रोज सायंकाळी जमा करून ते गावाबाहेर त्याची विलहेवाट लावत आहेत.