लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : विविध शाखेत प्रवेश घेण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व अन्य कागदपत्रे वेळेत गोळा करण्यासाठी विद्यार्थ्यांची दमछाक होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. एकाच कामासाठी सेतु केंद्रावर विद्यार्थ्यांसह पालकांची एकच गर्दी होत आहे.दहावी, बारावीचा निकाल लागल्यानंतर विविध शाखेकडे आॅनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरण्याला सुरुवात झाली आहे. त्यासाठी जातीचा दाखला, नॉन क्रिमीलेअर, जात पडताळणी प्रमाणपत्र किंवा त्याची पोच पावती आवश्यक असते, जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक असलेला कोतवाल बुकाची नक्कल, उत्पनाचे दाखले व आवश्यक कागदपत्रे वेळेत मिळावे यासाठी विद्यार्थ्यांसह पालकाला सेतू केंद्रावर यावे लागत आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या आधारकार्डमध्ये त्रूटी आहेत. त्रूटीची पुर्तता करण्यासाठीदेखील विद्यार्थ्यांची सेतु केंद्रासमोर रांग लागत आहे. नेट कॅफेवर आॅनलाईन नोंदणी केल्यावर कागदपत्रे पडताळणीसाठी काही निवडक केंद्रे दिली आहे. मानोरा तालुक्यातील विद्यार्थ्यांना पुसद केंद्र जवळ पडत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी तिकडे जास्त प्रमाणात धाव घेतली. परंतु पुसदला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्यामुळे कामासाठी विलंब होत आहे. विविध प्रकारच्या कागदपत्रांच्या पुर्ततेसाठी पालकांच्या खिशाला हजारो रुपयांची कात्री लागत आहे. (प्रतिनिधी)
शैक्षणिक कागदपत्रांसाठी विद्यार्थ्यांची दमछाक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 12:59 PM