२०२१-२२ या शैक्षणिक वर्षामध्ये शाळा सुरू होतील की नाही, हे स्पष्ट झाले नसल्याने पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच लहान मुलांचा लसीकरण झाल्यावरच शाळेत प्रवेश व्हावा, असा पालकांचा मानस असल्याचे दिसून येते. नर्सरी ते पहिल्या वर्गाच्या प्रवेशासाठी पालकांनी पाठ फिरवली असल्याचे दिसून येत आहे. तसेच मागील वर्षी संपूर्ण शिक्षण हे आभासी पद्धतीनेच झाले होते. परंतु, ते समाधानकारक न झाल्याने पालकांनी शाळेकडे पाठ फिरवली असल्याचे दिसते. या नवीन वर्षाच्या शैक्षणिक सत्रामध्ये पालक लहान मुलांच्या प्रवेशासाठी आग्रही नसल्याचे दिसून येत आहे. काही शाळांमध्ये आभासी वर्ग समाधानकारक झाले असता काही शाळेत वर्ग नावापुरतेच झाल्याचे चित्र होते. ऑनलाइन वर्ग सर्वच विद्यार्थ्यांना शक्य नसल्याने बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या तसेच ग्रामीण भागामध्ये इंटरनेट कनेक्शन, नेट कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे विद्यार्थी ऑनलाइन वर्गाला जोडू शकले नाहीत. शालेय अभ्यासवर्ग वगळून मुले दुसरीकडे प्रवृत्त झाल्याचेही काही पालकांनी सांगितले. ऑनलाइन शिक्षण मुलांना सोईस्कर नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सध्या विद्यार्थी आभासी पद्धतीच्या वर्गाकडे पाठ फिरवत असून, पालक वर्गामध्ये सुद्धा नाराजीचा सूर उमटत आहे.
आभासी वर्गाकडे विद्यार्थ्यांनी फिरवली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2021 4:29 AM