जिवलग, नातलगांना आपली खुशाली कळवायची आणि त्यांचे सर्वकाही मजेत चालले की कसे, हे जाणून घेण्यासाठी पूर्वी केवळ पत्रव्यवहाराचाच पर्याय उपलब्ध होता. सायकलने गावोगावी फिरून पत्र गोळा करणाऱ्या पोस्टमनच्या येण्याची सर्वच जण आतुरतेने प्रतीक्षा करीत असत. कालांतराने दूरध्वनी आणि त्यानंतर भ्रमणध्वनीचा वापर वेगाने वाढला आणि त्या ओघात पत्रव्यवहार व पोस्टमन लुप्त झाले. दरम्यान, पत्र पाठविणे आणि समोरून येणारे पत्र वाचून होणारा आनंद आताच्या पिढीला उपभोगता यावा, यासाठी विठाबाई पसारकर विद्यामंदिराने पत्रलेखनाचा उपक्रम राबविला. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना मामा, काका, मावशीला पत्र लिहायला सांगण्यात आले. या माध्यमातून विद्यार्थीही बोलते झाले. सहभागी विद्यार्थ्यांनी जोडकार्ड नातलगांना पाठविले असून दुसऱ्या कार्डवर स्वत:चा पत्ता लिहून पाठविला आहे. जेणेकरून पत्र मिळाल्यानंतर उत्तरही येणे अपेक्षित आहे, हा त्यामागील उद्देश होय. या उपक्रमाने जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती पसारकर विद्यामंदिराचे संचालक अविनाश पसारकर यांनी दिली.
विद्यार्थ्यांनी लिहिले मामा, मावशीला पत्र!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 4:39 AM