ऑनलाइन लोकमत
वासिम दि. २३ - स्वातंत्र्यलढ्यात आझाद हिंदसेना स्थापन केल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जपानमध्ये या सेनेला उद्देशून केलेले भाषण वाशिम शहरातील राष्ट्रप्रेमी व क्रांतिकारक विचारांनी भारलेल्या तरुणांनी त्या काळात शहरातील एका चौकात रेडिओ लावून जाहीरपणे ऐकले होते. तेव्हा या चौकाचे नाव सुभाष चौक देण्यात आले होते. हाच चौक आताही नेताजींच्या स्मृती जपतो आहे. आज, २३ जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती असून या चौकात त्यांना युवकांच्यावतीने अभिवादन केले जाते.
वाशिम जिल्ह्याचा स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास अतिशय जाज्वल्य आहे. जिल्ह्यात सशस्त्र क्रांतीकारक गंगाधर सदाशिव कल्याणकर, रामचंद्र आनंदराव फाळके व अन्य क्रांतिकारकांनी १९२७ साली जहालांची गट बनवून इंग्रजांविरुद्ध अनेक षडयंत्रे रचली. स्वातंत्र्यलढ्यात आझाद हिंदसेना स्थापन केल्यानंतर शहरातील सुभाष चौकात रेडिओ लावून जाहीरपणे हे भाषण ऐकले होते. वाशिममधील तो चौक सुभाष चौक या नावाने नेताजी सुभाषचंद्र बोस, त्यांची आझाद हिंद सेना व त्या काळी त्यांच्या विचारांनी भारावलेल्या युवकांच्या मनात चेतलेल्या राष्ट्रप्रेमाच्या स्फुलिंगांची आठवण अद्यापही जपत आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्यासाठी लढा लढण्यासाठी बहाद्दर अशा शुरवीर तरुणांची आझाद हिंदसेना स्थापन केली होती. त्यांनी त्या काळी देशातील तरुणांच्या मनात राष्ट्रभक्तीची भावना जागवीत त्यांना ब्रिटीशाविरुद्ध सशस्त्र लढा देण्यासाठी सज्ज केले होते.त्यांच्या क्रांतिकारी विचारांनी भरलेल्या भाषणांनी त्यावेळी देशातील तरुणांचे रक्त सळसळत असे. ‘तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा’ अशी घोषणा देणा-या नेताजींच्या नेतृत्वाखाली अनेक तरूण आझाद हिंद सेनेत दाखल झाले होेते. जे प्रत्यक्ष आझाद हिंद सेनेमध्ये दाखल झाले नाहीत, परंतु, नेताजींच्या सशस्त्र लढ्याला ज्यांचा पाठिंबा होता. मनापासून त्यांच्यासोबत होते अशा तरुणांचीही संख्या देशात मोठी होती. त्यावेळी वाशिम शहरातदेखील त्यांच्या विचारांनी भारलेले अनेक तरुण होते. या तरुणांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जपानमधून आझाद हिंद सेनेला उद्देशून दिलेल्या भाषणाचे रेडिओ आॅफ जपानवरुन केले जाणारे प्रसारण जाहीरपणे चौकात रेडिओ लावून ऐकायचे असे ठरवले. त्यानुसार ब्रिटिश सैनिकांची भिती न बाळगता ठरलेल्या वेळी शहरातील काटीवेसच्या दक्षिणेस असलेल्या चौकात रेडिओ लावून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे भाषण स्वत: ऐकलेच पण, सर्वांना ऐकवले. या घटनेची स्मृती म्हणून स्वातंत्र्यानंतर या चौकाचे नेताजी सुभाषचंद्र बोस चौक असे रीतसर नामकरण करण्यात आले.
आता तो सुभाष चौक नावाने ओळखला जातो. स्वातंत्र्यलढ्याच्या काळातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या ऐकलेल्या भाषणाची व त्या आठवणीची स्मृती ताजी ठेवून जपत आहे.