.......................
मालेगावात आढळला केवळ एक रुग्ण
वाशिम : जिल्ह्यातील मालेगाव शहरात बुधवारी केवळ एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला. दोन महिन्यांपासून गडद झालेले हे संकट आता बहुतांशी निवळत चालल्याचे यावरून दिसून येत आहे.
....................
७०० गावांमध्ये बाल संरक्षक समिती
वाशिम : बालविवाह रोखण्यासाठी ७०० गावांमध्ये बाल संरक्षक समिती कार्यान्वित करण्यात आलेली आहे. गाव परिसरात बालविवाह होत असल्यास, तो रोखण्यासाठी समितीमधील सदस्यांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले.
........................
शंभरावर लाभार्थींची नावे समाविष्ट
वाशिम : तालुक्यातील शंभरावर लाभार्थींची नावे शिधापत्रिकांमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आली असून, ६० जणांची नावे शिधापत्रिकांमधून वगळण्याची कार्यवाही करण्यात आली आहे, अशी माहिती पुरवठा विभागाचे निरीक्षक नीलेश राठोड यांनी दिली.
.................
पाणीपुरवठा विस्कळीत; नागरिक त्रस्त
वाशिम : जुने शहरातील ध्रुव चौक परिसरात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दोन ते तीन दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याने त्यांच्यात नाराजीचा सूर उमटत आहे.
.....................
रिक्त पदे तत्काळ भरण्याची मागणी
वाशिम : जिल्ह्याच्या कृषी विभागात अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची कामे होण्यास विलंब लागत आहे. कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची मागणी शेतकरी रवि भुतेकर यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे सोमवारी केली.
...................
शासकीय कार्यालयांमध्ये खबरदारीचा अभाव
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचे संकट अद्याप निवळलेले नाही. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शासकीय कार्यालयांनी किमान थर्मल गनद्वारे येणाऱ्या नागरिकांची तपासणी करायला हवी. याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे.
....................
रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याचे आवाहन
वाशिम : शहरातील सर्व शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये, व्यापारी संकुल व सर्व खासगी इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगची सुविधा करून, ती कार्यरत राहील, याची दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शन्मुगराजन एस. यांनी केले आहे.
.....................
हायमास्ट लाइट सुरू करण्याची मागणी
वाशिम : मालेगाव, शिरपूर, रिसोड, सेनगाव, हिंगोली या ४६१ बी राष्ट्रीय महामार्गाचे नूतनीकरण पूर्ण होऊन काही ठिकाणी हायमास्ट लाइट लावण्यात आले. मात्र, ते बंद असून, सुरू करण्याची मागणी होत आहे.
......................
लोणी फाटा परिसरात वाहतूक विस्कळीत
वाशिम : रिसोड येथील लोणी फाटा परिसरात बुधवारी दुपारी १२ वाजेदरम्यान वाहतूक विस्कळीत झाली होती. विविध वस्तू व साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असल्याने हा प्रकार नेहमीच घडत आहे.
...............
उन्हाची तीव्रता वाढली; पिके धोक्यात
वाशिम : गेल्या काही दिवसांपासून पाऊस होण्याऐवजी दिवसभर कडक उन्ह तापत आहे. यामुळे खरिपातील नुकतीच अंकुरलेली कोवळी पिके धोक्यात सापडली आहेत. काही ठिकाणी स्प्रिंकलरने पाणी देऊन पिके वाचविण्याची धडपड सुरू आहे.
...................
छुप्या पद्धतीने गुटखा विक्री सुरूच
वाशिम : पोलीस प्रशासनाने चालू महिन्यांत गुटखा जप्तीच्या अनेक कारवाया केल्या. पानटपऱ्यांचीही झाडाझडती घेणे सुरू आहे. असे असताना छुप्या पद्धतीने गुटखा विक्री सुरूच असल्याचे दिसत आहे.
....................
लसीकरण शिबिरास नागरिकांतून प्रतिसाद
वाशिम : शहरातील जुनी आययूडीपी काॅलनी येथे २९ जूनपासून राबविण्यात येत असलेल्या कोरोना लसीकरण शिबिरास नागरिकांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याची माहिती नगरसेवक विनोद खंडेलवाल यांनी दिली.