वाशिम : कोरोना विषाणुसंदर्भात प्रशासनाच्यावतिने जिल्हास्तरावर करण्यात येत असलेल्या उपाययोजना व अंमलबजावणीबाबतचे अहवाल दर तीन दिवसांनी सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी संबधित अधिकारी यांना दिलेत.केंद्र शासनाने १५ एप्रिल रोजी अधिसूचना काढून लॉकडाउन कालावधी ३ मे पर्यंत वाढविला. लॉकडाउनच्या कालावधील कोव्हीड-१९ या विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाची विविध उपाययोजनांची अंमलबजावणी सुरु आहे. त्यामध्ये बाहेरुन आलेल्या व्यक्तिंना गरजेनुसार होम क्वारंटाईन करण्यात आलेले आहे, परंतु होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्ती घरांमध्ये न राहता बाहेर फिरत असल्याचे इतर जिल्हयात आढळून आल्याचे लक्षात आले आहे. वाशिम जिल्हयात ही अशी परिस्थिती होण्याची शक्यता नाकारता येत नाही , त्यामुळे ज्या व्यक्ंितना होम क्वारंटाईन करुन ठेवलेले आहे अशी व्यक्ती होत क्वारंटाईनच्या कालावधित बाहेर आढळून आल्यास संबधितांवर भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. याशिवाय आपल्या तालुक्यात विना परवाना, आदेशाविना इतर राज्यातून किंवा मुंबई, पूणे यासारख्या महानगरातून लोक आलेले असल्यास, अशा व्यक्तिंवर ही गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. सदरचा गुन्हा महसूल, पोलीस, ग्रामविकास विभागाचे अधिकारी, कर्मचारी दाखल करु शकतात. केलेल्या कारवाईचा व बाबींचा अहवाल दर तीन दिवसांनी न चुकता सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिले.
कोरोना विषाणुसंदर्भातील उपाय योजनांचा अहवाल दर तीन दिवसांनी सादर करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 6:29 PM