मानोरा : येथील पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गादेगाव ग्रामपंचायतीमध्ये अनेक कामे अनियमित केली गेली आहेत तसेच निधीमध्ये अफरातफर करण्यात आली असून, याची चौकशी करुन दोषींविरुद्ध कारवाई करावी, या मागणीकरिता गादेगाव येथील सुदाम भिका जाधव यांनी १६ फेब्रुवारीपासून पंचायत समितीसमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे.
गादेगाव येथील गट क्रमांक २४९ व ९२मध्ये विहीर न खोदता अंतिम देयक लावून दोन्ही विहिरींचे पूर्ण पैसे काढणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे, सन २०१५मध्ये मयत असलेल्या महादू बापूराव खोडे यांना २०१८मध्ये कामावर दाखवून शासनाच्या निधीत अफरातफर करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, स्मशानभूमीत पक्के घर बांधकाम करणाऱ्यांवर कारवाई करा, चौकशी अधिकाऱ्यांनी चौकशी केली का नाही? याची चौकशी करा, गट क्रमांक ३०९, ३१० शासकीय जमीन व स्मशानभूमीच्या जागेची मोजणी करा तसेच विभागीय आयुक्त यांच्या आदेशाने सचिव एस. बी. पातोड़े यांच्यावर कारवाई करा, आदी मागण्यांकरिता जाधव यांनी उपोषण सुरु केले आहे.